अजित पवारांमुळे भाजपची सत्ता गेली; दरेकरांनी लगावला टोला

pravin darekar says BJP lost power due to Ajit Pawar
pravin darekar says BJP lost power due to Ajit Pawar

मुंबई :  विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली. आमचं सरकार आलं, म्हणून त्यांना पुन्हा या पदावर नियुक्त करण्यात आलं, असं अजित पवार त्यांचं अभिनंदन करताना म्हणाले होते. यावरूनच भाजपा नेते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना टोला लगावला. आमच्यासाठी अजित पवारांचा पायगुण काय होता. आमच्या बरोबर अजित पवार आले तेव्हा सत्तेचं काय झालं? अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली, असं दरेकर यावेळी म्हणाले.

उपसभापतीपदाची निवडणुकीचा विषय न्यायालयात प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक घेतली. याबद्दल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारने लोकशाहीच्या हक्काची पायमल्ली केल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. तसेच करोना, शेतकरी आत्महत्या, कायदा सुव्यवस्था आणि मराठा आरक्षणासारखे महत्वाच्या विषयांवर चर्चा न करताच विधिमंडळाचे कामकाज केवळ रेटून नेण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 “आमचा विरोध असतानाही विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी प्रक्रिया रेटून नेण्याची सरकारने भूमिका घेतली. त्यानंतर आम्ही उच्च न्ययालयात यासंदर्भात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने सरकारच्या महाभिवक्त्यांना बोलावले आणि त्यांची भूमिका समजून घेतली आणि यासंदर्भात पुढील सुनावणी गुरुवारी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. हेच मी सभापती आणि सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले,” असंही ते म्हणाले. “न्यायालयाच्या प्रक्रियेचा विषय असताना, मूलभूत हक्कांची गळचेपी होत असताना आपण अशा प्रकारे प्रस्ताव मंजूर करता हे योग्य नाही. पण महाविकास आघाडीला कामकाज रेटून न्यायाचे आहे. अशी टीका दरेकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here