सोमवारच्या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत हे दाखवून द्यावं – महाविकास आघाडी

press-conference-held-by-mahavikas-aghadi-on-the-backdrop-of-maharashtra-bandh-on-october-11-Monday-sanjay-raut-said
press-conference-held-by-mahavikas-aghadi-on-the-backdrop-of-maharashtra-bandh-on-october-11-Monday-sanjay-raut-said

मुंबई: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराचे (lakhimpur kheri violence) पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. या हिंचाराबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत खेद व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची (Maharashtra Bandh) हाक दिली. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) महाविकासआघाडीच्या घटक पक्षांची पत्रकारपरिषद झाली.

 यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या बंदमध्ये शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असून, हा बंद १०० टक्के यशस्वी होणार असल्याचे बोलून दाखवले. या पत्रकारपरिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची देखील उपस्थिती होती.

संजय राऊत म्हणाले, “केंद्र सरकार किंवा त्या संबंधित पक्षाच्या नसानसात अमानुषता भरलेली आहे आणि या विरोधात देशातील जनतेला जागं करण्यासाठी, शेतकरी एकाकी नाही आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, याची सुरूवात महाराष्ट्रामधून व्हावी, यासाठी महाविकासआघाडीने ११ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. या बंदमध्ये तिन्ही पक्ष सहभागी होतील. स्वत: शरद पवार यांनी देखील काल सांगितलं आहे की बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत हे देशाला दाखवून द्यावं.

दोन दिवसांपूर्वी मी दिल्लीत होतो. राहुल गांधी यांच्याशी देखील माझी या विषयावर चर्चा झाली. साधारण तिथं असंही ठरलं की महाराष्ट्राच्या पाठोपाठ इतर राज्यांनी देखील अशाप्रकारच पावलं उचलावी, जिथे जिथे आपली सरकारं आहेत, जिथे संघटन मजबुत आहे.

त्या सर्वच राज्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हा बंद पुकारला जावा आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपल्याला रस्त्यावर जरी उतरता आलं नाही, तरी जिथून आहे तिथून पाठींबा द्यावा. त्या शिवाय या निघृण कृतीला आळा बसणार नाही. जनता झोपलेली नाही. अन्नदाता शेतकरी एकाकी नाही. हे दाखवण्याची ही वेळ आहे. म्हणून मी एवढचं सांगेन की, काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांबरोबर शिवसेना देखील या बंदमध्ये पूर्ण ताकदीने उतरेल.”

तसेच, “पण ताकद लावण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. एकदा बंदचा पुकार केल्यावर आणि मुख्यमंत्री व शरद पवार यांनी देखील त्या बंदबाबत भूमिका जाहीर केल्यावर, लोकं स्वयंस्फुर्तीने हा बंद पाळतील. कोणतीही ताकद लावावी लागणार नाही. कारण, लखीमपूर खेरीमध्ये जे घडलंय त्याची जखम या देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनावर झालेली आहे आणि प्रत्येकजण हळहळतोय.

त्याने ते डोळ्याने पाहिलेलं आहे, की कायदा कसा चिरडला जातो. गुन्हेगारांना कसं मोकाट सोडलं जातं? चार शेतकऱ्यांचे खून करून देखील, केंद्रीयमंत्र्यांचा मुलगा कसा मोकाट फिरतो. हे जनतेने देशात पाहिलेलं आहे आणि त्याचा धिक्कार म्हणून ११ ऑक्टोबरचा हा बंद आम्ही पुकारला. हा बंद १०० टक्के यशस्वी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here