मुंबई: महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे. जेव्हा जेव्हा लोकशाही, संविधान संपवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा या महाराष्ट्राने लोकशाही आणि संविधान मानणा-यांना ताकद दिली आहे. जातीच्या व धर्माच्या नावाने राजकारण करणारा भाजपा संविधान व्यवस्था संपवू पाहत असताना महाराष्ट्रातील जनतेने आज पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले व आंबेडकर विचाराला ताकद देण्याचा संकल्प केलेला आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव स्पष्ट दिसत आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना वारंवार महाराष्ट्रात प्रचाराला यावे लागत आहे, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
नागपुर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सोलापुरातील विडी घरकुल योजना ही डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारची आहे, या योजनेच्या चाव्या द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत, चाव्या देणे एवढीच मोदी गॅरंटी आहे. युपीए सरकारच्या काळातील ही योजना पूर्ण करण्यास मोदी सरकारला १० वर्ष लागली. विडी घरकुलबदद्ल मोदींची गॅरंटी म्हणजे ‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशी आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी असे खोटे बोलू नये. परवाच मुंबईतील सागरी सेतूच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी आले होते. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान कमी व प्रचारप्रमुख जास्त वाटतात, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
अयोध्येतील राम मंदीराचे दरवाजे राजीव गांधींनी उघडले.
अयोध्येतील राम मंदीरावरुन काँग्रेसवर केली जात असलेली टीका चुकीची आहे. पंतप्रधान राजीव गांधी यांनीच अयोध्येतील श्रीराम मंदीराचे दरवाचे उघडून श्रीराम दर्शनाची व्यवस्था केली व शिलान्यासही त्यांच्याच काळात झाला. राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीही राजीव गांधी यांनी प्रयत्न केले पण राजीव गांधींच्या प्रस्तावाला भाजपाने त्यावेळी विरोध केला होता, मग आता मंदीर कुठे बांधत आहेत? असा सवाल पटोले यांनी केला.
राहुल गांधींना अटक करुन तर दाखवा…
राहुल गांधी यांना अटक करु असे आसामचे मुख्यमंत्री म्हणत आहेत, त्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, ते हुकूमशाहीवृत्तीचे लोक आहेत ते असेच बोलणार. राहुल गांधींना भाजपा घाबरते त्यातूनच कारवाईची धमकी दिली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना जरुर अटक करावी. देशाच्या जनतेला न्याय देण्यासाठी राहुल गांधींनी यात्रा काढली आहे, देश त्यांच्यासोबत आहे, भारत जोडो न्याय यात्रेला जनतेचे मोठे समर्थन मिळत आहे म्हणूनच ते घाबरले आहेत. राहुल गांधींवर कारवाई करून दाखवा, जनताच त्यांना चोख उत्तर देईल.
भाजपाचे महिला सशक्तीकरण फसवे..
भारतीय जनता पक्षाचे महिला सशक्तीकरण फसवे असून ते ‘बोलाचाच भात व बोलाचीच कढी’ असा प्रकार आहे. देशासाठी ज्या मुलींनी ऑलिंपिकमधून सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावला त्या महिला खेळाडूंचे धिंडवडे भाजपाने कसे काढले हे देशाने पाहिले आहे. भाजपा सातत्याने महिलांचा अपमान करत आहे. ज्यांनी ज्यांनी महिलांवर अत्याचार करण्याचे पाप केले त्यांचा नाशही अटळ आहे हेच रामायण व महाभारताने दाखवले आहे. आजच्या महागाईत घर चालवणे महिलांना किती कठीण जात आहे त्यावर भाजपा का बोलत नाही? काँग्रेस पक्षात महिलांचा सन्मान केला जातो. काँग्रेस जय सीयाराम म्हणतो तर भाजपावाले जय श्रीराम म्हणतात. सीतेशिवाय भगवान श्रीराम पूर्ण होऊ शकत नाहीत. भाजपावाले जय श्रीरामाचे नारे लावतात व सीतेला बाजूला करतात, हा काँग्रेस व भाजपातील फरक आहे, असेही नाना पटोले म्हणाले.