Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवार, १९ जानेवारी) रोजी मुंबईत येणार असून मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि अन्य काही संस्थांच्या नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठीच्या नियोजनासाठी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र महानगरपालिकेच्या प्रकल्पांचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. त्यापैकी बहुतांश प्रकल्पांचे नियोजन हे शिवसेनेच्या कार्यकाळात झाले असल्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपामध्ये श्रेयाची लढाई जुंपली आहे.
दरम्यान मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्वीट करून माहिती दिली आहे. “मी उद्या मुंबईत असेन. ३८ हजार कोटी रुपयांचा खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.” असं मोदींनी सांगितलं आहे.
मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल.
— Narendra Modi (@narendramodi) January 18, 2023
मुंबई महानगरपालिकेची निवडणू लवकरच होणार आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेची सत्ता शिवसेनेकडून हिसकावून घेण्याचा चंग भाजपाने बांधला आहे. गेली २५ वर्षे महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असून मुंबईवर शिवसेनेची पकड आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. मात्र या सर्व प्रकल्पांचे नियोजन, पूर्वतयारी, पाठपुरावा शिवसेनेच्या कार्यकाळातच झाला असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.