चंदीगढ l पंजाबमधील राजकीय नाट्यमय घडामोडी थांबत नसल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा सोपवलेला असताना, आता पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu ) यांनी राजीनामा दिला आहे.
सिद्धू यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी देखील त्यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सिद्धू यांनी पत्र पाठवलेले आहे.
सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात सिद्धू म्हणतात, ”तडजोडी करण्यापासून माणसाचे चारित्र्य ढासळण्यास सुरूवात होते. मी पंजाबचे भवितव्य व पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यावर तडजोड करणार नाही. त्यामुळे मी पंजाबच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे.”
Punjab Congress chief Navjot Singh Sidhu resigns pic.twitter.com/KbDbderXeo
— ANI (@ANI) September 28, 2021
गेल्या काही दिवासांपासून पंजाबमधील राजकारण दररोज वेगवेगळी वळणं घेताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादाने राजकीय घडामोडींना सुरूवात झाली.
काही दिवसांनी या दोघांमध्ये सामंजस्य झाल्याचं देखील दिसून आलं होतं. मात्र, अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने पंजाबमधील राजकीय समीकरणंच बदलली. पण ही समीकरणं आता मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग हे आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर टीका करण्याचं धोरण अवलंबलं आहे. विशेषत: नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. “नवज्योतसिंग हा देशासाठी एक आपत्ती ठरणार आहे. त्यामुळे २०२२मध्ये मी त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवार उभा करीन. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला माझा कायम विरोध असेल”, असं देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होतं.