देशातील तरूण राहुल गांधींना पंतप्रधानपदी पाहू इच्छितो – नाना पटोले

Rahul-Gandhi-birthday –Nana- Patole-congress-tilak- bhavan-mumbai-news-update
Rahul-Gandhi-birthday –Nana- Patole-congress-tilak- bhavan-mumbai-news-update

मुंबई:काँग्रेस नेते खा. राहुल गाधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेसने केलेल्या विविध कार्यक्रमातून एक चांगला संदेश देशभरात गेला असून कोरोनामुळे संकटात असलेल्या गरजू, गरिब लोकांना रेशन, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप करून काँग्रेस पक्षाचे प्राधान्य हे प्रथम जनहित आहे हे दाखवून दिले आहे. कोरोना संकट मोदी सरकारने अत्यंत बेजबाबदारपणे हातळल्याने देश २० वर्ष मागे गेला आणि सामान्य लोकांचे संसार उघड्यावर आणले. डॉ. मनमोहनसिंह, राहुल गांधी यांनी केलेल्या सुचनांचा विचार न केल्यामुळे देशाला मृत्यूच्या खाईत लोटण्याचे काम केले आहे. या मोदी सरकारच्या खोटारडेपणाचा मुकाबला करत महाराष्ट्रासह देशभर काँग्रेस पक्षाला मजबूत करणे हाच राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचा खरा संकल्प ठरेल, असे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी म्हटले आहे.

खा. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विविध कार्यक्रम राबवून संकल्प दिन साजरा केला तसेच काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या दादर येथील टिळक भवनच्या नुतनीकरणानंतरचा उद्घाटन सोहळा पार पडला, यावेळी पाटील बोलत होते. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, मागील ७ वर्षापासून देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार असून ते मनमानी पद्धतीने काम करत आहे. राहुलजी गांधी यांनी मोदी सरकारला लोकांच्या हितासाठी अनेकदा सुचना केल्या. त्या सुचना किती हितकारक होत्या त्याची जाणीव आता होत आहे. नोटबंदी, जीएसटी, कोरोनाचे संकट यावर त्यांनी विधायक सुचना केल्या पण त्याकडे मोदी सरकारने लक्ष दिले नाही त्याचा परिणाम देशातील जनतेला भोगावे लागत आहेत.

राहुल गांधी यांनी मांडलेली भूमिका मोदींनी स्विकारली असती तर मोठी हानी टळली असती. देशाला आता दूरदृष्टी असलेला, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा, सर्वसमावेशक अशा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची गरज आहे आणि देशातील तरूणवर्गही राहुल गांधी यांना देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याचे पाहू इच्छित आहे. राहुल गांधी हे मोदी सरकारविरोधात संघर्ष करत आहेत त्यांच्या या संघर्षाला ताकद देऊन महाराष्ट्रात काँग्रेसला क्रमांक एकचा पक्ष करण्याचा आपला संकल्प आहे.

यावेळी बोलताना मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात नाईलाजाने काँग्रेस पक्षातून काही लोकांना बाहेर जावे लागले त्या सर्वांसाठी घरवापसीचा कार्यक्रम हाती घेण्याची गरज आहे.जनसंपर्काचे अभियान हाती घेऊन आगामी काळात कामाला लागले पाहिजे. राहुल गांधींच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे काम करण्यासाठी पक्ष संघटना व शासन एकत्र येऊन काम करावे लागणार आहे, यातूनच काँग्रेस पक्षाचा विस्तार होईल.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाला आज राहुल गांधी यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. खऱ्या अर्थाने आज काँग्रेसचा संकल्प दिन आहे. सोनियाजी, राहुलजी यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाला राज्यात पुन्हा एकदा नंबर एकचा पक्ष करण्यासाठी आपणास काम करावे लागणार आहे.  

माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, नाना पटोले यांनी पक्षाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेऊन अवघ्या तीन चार महिन्यातच वादळ उठवून दिले आहे याचा अभिमान वाटतो. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा त्याग करून ते पक्षासाठी ही पालखी घेऊन पुढे निघाले आहेत.

खूर्ची सोडून पक्षासाठी वाहून घेणे ही साधी गोष्ट नाही. स्वबळावर निवडणुका लढवण्याचा त्यांचा नारा हा संघटनेत नवी उमेद व ताकद उभी करण्याचे काम करणारा आहे. नाना पटोले हे काँग्रेसचा झेंडा घेऊन नव्या जोमाने निघाले आहेत. खऱ्या अर्थाने ते बारा बलुतेदारांचे कैवारी असून त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा जोमाने उभी राहिल.

टिळक भवनमधील कार्यक्रमाआधी संत रोहिदास चौकात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, खाद्यतेलाची दरवाढ तसेच मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत आंदोलन करण्यात आले.राज्यभर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध करत आंदोलन केले.

आ. झिशान सिद्दीकी यांनी अन्नधान्य वाटपाबरोबरच १० ऑक्सिजन कांन्स्ट्रेटर प्रदेश कार्यालयाकडे सुपूर्द केले. काँग्रेसचे मुख्यपत्र असलेल्या शिदोरी मासिकाच्या विशेष अंकाचे प्रकाशनही या कार्यक्रमात करण्यात आले.

या कार्यक्रमाला एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,  मंत्री अशोक चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश पांडे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, रजनी पाटील, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, खा. कुमार केतकर, मा. खा. भालचंद्र मुणगेकर,  प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, मोहन जोशी, चारुलता टोकस, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ. अमिन पटेल, आ. झिशान सिद्दीकी, मा. खा. संजय निरुपम, मा. आ. बाबा सिद्दीकी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा, सोनल पटेल, वामशी रेड्डी, बी.एम. संदीप, पृथ्वीराज साठे, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा, प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, देवानंद पवार, राजन भोसले, राजाराम देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here