राहुल गांधींचं प्रकाश आंबेडकरांना पत्र…; संविधान सभेबाबत म्हणाले…!

rahul-gandhi-letter-to-prakash-ambedkar-over-invitation-for-samvidhan-samman-mahasabha-rahul-gandhi-letter-publish-x-heandel-vba-news-update-today
rahul-gandhi-letter-to-prakash-ambedkar-over-invitation-for-samvidhan-samman-mahasabha-rahul-gandhi-letter-publish-x-heandel-vba-news-update-today

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वंचित बहुजन आघाडीकडून (VBA) आयोजित करण्यात आलेलया संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांना निमंत्रण पाठवलं होतं. वंचित बहुजन आघाडीने शनिवारी (२५ नोव्हेंबर) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर (दादर) संविधान सन्मान महासभेचं आयोजन केलं आहे. उद्या देशभरात संविधान दिन साजरा केला जाणार आहे. मात्र,राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकरांना एक पत्र पाठवून आपल्या भावना त्याव्दारे कळविल्या आहे. ते पत्र वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर ट्विट केले आहे.

या संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला वंचितने ही महासभा बोलावली आहे. वंचितने या सभेसाठी देशातील अनेक विरोधी पक्षांना आणि नेत्यांना या सभेचं निमंत्रण दिलं आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेत देशाचं संविधान, लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय आणि सद्यस्थिती यावर चर्चा केली जाईल.

या सभेतून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर देशातील सत्ताधारी नरेंद्र मोदी सरकारवर आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी या सभेसाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनादेखील निमंत्रण दिलं आहे. राहुल गांधी या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. परंतु, त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पत्र लिहून या सभेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काय म्हणाले राहुल गांधी पत्रात…

राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, संविधान सन्मान महासभेचं निमंत्रण दिल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. तसेच संविधान दिनानिमित्त तुम्ही ही महासभा आयोजित केल्याबद्दल तुमचं आणि वंचित बहुजन आघाडीचं अभिनंदन करू इच्छितो. आपण आज एका गभीर परिस्थितीता सामना करत आहोत. आपण गेल्या नऊ वर्षांमध्ये आपल्या घटनात्मक मूल्यांवर हल्ला होताना पाहिलं आहे. आपल्या बलाढ्या देशाचा पाया रचणाऱ्यांच्या विचारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याची आता नितांत गरज आहे.

राहुल गांधी हे सध्या तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या कामांत व्यस्त आहेत. त्यामुळे ते मुंबईत संविधान सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी पत्रात म्हटलं आहे की, दुर्दैवाने माझ्या चालू असलेल्या मोहिमेमुळे मी या सभेला उपस्थित राहू शकणार नाही. मी वंचित बहुजन आघाडीला त्यांच्या भावी वाटचालीसाठी आणि तुमच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना शुभेच्छा देतो.

प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रणात म्हटलं होतं?

सध्या देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा मिळून संविधानिक मूल्ये आणि आदर्श नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याशी लढण्याच्या आपल्या दोघांच्या वचनबद्धतेच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारावरून, वंचित बहुजन आघाडी या आमच्या पक्षाच्या वतीने मी तुम्हाला संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण देतो, या निमित्ताने तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो लोकांना संबोधित करण्याची आणि भारताच्या भविष्याबद्दलचा तुमचा दृष्टिकोन तथा भूमिका मांडण्याची संधी मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here