औरंगाबाद : एका वर्षानंतर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. मात्र, त्यामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीने घोळ केला. सहा दिवसात दोन याद्या जाहीर केल्या. कार्यकारणीची पहिली यादी ११ ऑक्टोबर रोजी जाहीर केली परंतु ती माध्यमांसमोर आलीच नाही. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी दुसरी यादी जाहीर केली. परंतु त्या यादीमध्ये माजी मंत्री राजेंद्र दर्डा समर्थकांचा तसेच भाजपचा काम करणा-या मंडळीचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतील अंतर्गत राजकारण चांगलेच चव्हाट्यावर आले आहे.
शहर जिल्ह्यात काँग्रेसची बिकट अवस्था झालेली आहे. शहर काँग्रेस कमिटीला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही. प्रभारी अध्यक्षांच्या भरोशावर कामकाज सुरु आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण मोरे यांच्या हस्ताक्षराने ११ ऑक्टोबररोजी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर झाल्यानंतर ती यादी दडवून ठेवण्यात आली. त्यानंतर बदल करुन १७ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्या सहीनीशी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची यादी जाहीर केली. पक्षाशी संबंध नसणा-या लोकांना संधी देण्यात आली असा आरोप कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.
११ ऑक्टोबरची यादी दडवली…
प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण मोरे यांच्या सहीनिशी छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीची यादी जाहीर करण्यात आली. परंतु ती यादी शहर काँग्रेस कमिटीने जाहीर न करता पुन्हा मुंबईवा-या करुन अंतर्गत वादामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडे जाऊन त्यात बदल केला. त्यामुळे निष्ठावंत काम करणारे कार्यकर्ते नाराज झाले. अशी चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.
१७ ऑक्टोबरची यादी माध्यमांना दिली…
शहर काँग्रेस कमिटीच्या कार्यकारणीत अंतर्गत विरोधकांना बाजूला करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून ११ ऑक्टोबरची प्रदेश सरचिटणीस प्रवीण मोरेंच्या सहीची यादी बदली. १७ ऑक्टोबरची प्रदेश सरचिटणीस देवानंद पवारची सही असलेली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची यादी जाहीर केली. त्यावरून शहर जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आला आहे.
पक्षाशी संबंध नसणा-यांचे नावे यादीत..
काँग्रेस पक्षाशी ज्यांचा संबंध नाही. जे कधीही कार्यक्रमात येत नाही त्यांची नावे काँग्रेसच्या कार्यकारणीत टाकण्यात आले. असा आरोप कार्यकर्त्यांमधून केला जात आहे. याबाबत वरिष्ठांकडे काही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.