राजकारणात धर्म आणू नये मात्र भाजपाचे राजकारण धर्माच्या आधारावरच; नाना पटोलेंचा हल्लाबोल

भाजपाच्या अत्याचारी व्यवस्थेविरोधात लढण्यासाठी रणरागिणींचा सहभाग महत्वाचा.

Religion should not be brought into politics but BJP's politics is based on religion; The attack of nana patole
Religion should not be brought into politics but BJP's politics is based on religion; The attack of nana patole

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य स्थापन केले तर संत महंतांनी अध्यात्माचे कार्य केले. शिवाजी महाराजांनी राजकारणात धर्म आणला नाही. छत्रपतींच्या सुराज्यात शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका अशी शिकवण होती पण आज भाजपाच्या राज्यात शेतकरी दररोज मरत आहे आणि सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीच देणेघेणे नाही. अनेक पक्षांची सरकारे आली व गेली पण त्यांनी राजकारणासाठी धर्माचा वापर केला नाही परंतु भारतीय जनता पक्ष धर्माचा वापर आपल्या राजकारणासाठी करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे सेल व विभागाच्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे, सोशल मीडीयाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रज्ञा वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी आपणही यापूर्वी देगणी दिली, विटा दिल्या, राम मंदिरासाठी न्यास आहे पण भाजपा मात्र राम मंदिराचे राजकारण करत आहेत.

अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अर्धवट आहे ते पूर्ण होण्यास आणखी तीन वर्षे लागणार आहेत परंतु निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा उठवण्यासाठी अर्धवट बांधकाम असलेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई भाजपाला झाली आहे. हिंदू धर्माचे सर्वोच्च असलेल्या चारही शंकराचार्यांचा अशा पद्धतीच्या प्राणप्रतिष्ठेला विरोध आहे. अर्धवट बांधकामाच्या मंदिरात प्राण प्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे शंकराचार्य सांगत आहेत पण भाजपा त्यांचेही ऐकत नाही. भारतीय जनता पक्ष धर्म भ्रष्ट करत आहे आणि आरोप मात्र काँग्रेस पक्षावर करत आहे.

राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले, झाशीची राणी यांचा काळ वेगळा होता व आताचा काळ वेगळा आहे. त्यावेळी अत्याचारी व्यवस्थेविरोधात लढा देताना पारतंत्र्य होते, अशा विपरीत परिस्थितीतही त्यांनी मोठ्या धैर्याने लढा दिला, त्यांचे विचार आजही प्रेरक आहेत, याच आपल्या प्रेरणास्रोत आहेत, त्यांचे विचार घेऊन पुढे जावा. आज आपण स्वातंत्र्यात आहोत आपल्याला मत मांडण्याचा अधिकार आहे.

भाजपाच्या अत्याचारी व्यवस्थेविरोधात उभे राहिले पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. नारीशक्ती मोठी शक्ती आहे, या शक्तीने भाजपाच्या अत्याचारी व्यवस्थेविरोधात आवाज उठवला पाहिजे. काँग्रेसच्या विविध विभाग व सेलच्या माध्यमातून ही नारीशक्ती गावागावात काँग्रेसचा विचार रुजवत आहेत हा प्रचार व प्रसार असाच कायम ठेवा व अत्याचारी व्यवस्था संपुष्टात आणून पुन्हा काँग्रेसचे सरकार आणा, असे आवाहन पटोले यांनी केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने ‘Donate for Desh’ हे अभियान सुरु केले आहे. या अभियानात महिलांनीही मोठ्या संख्येने भाग घेऊन १३८ रुपयांच्या पटीत ऑनलाईन देणगी द्यावी, असे आवाहनही पटोले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here