त्वचेची काळजी घेतील ‘हे’ पाच घरगुती फेस पॅक

चेहरा आणि डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं अन् सुरकुत्या घालवण्यासाठी घरातील हे सर्व पदार्थ तुमची मदत करतील. पाहा हे सोपे घरगुती फेस पॅक.

rid-of-dull-skin-and-dark-circles-make-this-5-amazing-face-packs-at-home-with-these-easily-available-ingredients
rid-of-dull-skin-and-dark-circles-make-this-5-amazing-face-packs-at-home-with-these-easily-available-ingredients

जागरण, चिंता, प्रदूषण यांसारख्या कितीतरी कारणांमुळे डोळ्याखाली काळे डाग, काळी वर्तुळं आणि सुरकुत्या येऊ शकतात. चेहरादेखील थकल्यासारखा आणि निस्तेज दिसू शकतो. अशा समस्यांवर उपाय करण्यासाठी बाजारात बरेच क्रीम, लोशन यांसारखी उत्पादने उपलब्ध असतात. परंतु, या क्रीम किंवा उत्पादनांमध्ये असणारे घटक सर्वांच्या त्वचेला चालतीलच असे सांगता येत नाही. त्यामुळे जर घरात असणाऱ्या पदार्थांनी आणि कोणत्याही रसायनांचा वापर न करता काही उपाय करता आले तर कोणाला नाही आवडणार? चेहऱ्याची त्वचा, खासकरून डोळ्याखालील त्वचा ही नाजूक असते, त्यामुळे हे घरगुती उपाय त्वचेची काळजी घेऊन, तुमची समस्याच दूर करण्यास मदत करू शकतात.

हळद, दही, काकडी यांसारखे पदार्थ घरी अगदी सहज उपलब्ध असतात. त्यांचाच वापर तुम्ही चेहऱ्यावरील निस्तेजपणा, डोळ्याखालील काळी वर्तुळं व सुरकुत्या कमी करण्यासाठी करू शकता. यासाठी हे पाच झटपट तयार होणारे फेस पॅक पाहा.

 घरगुती फेस पॅक कसे बनवावे?

१. कोरफड

कोरफड ही आपल्या त्वचेसाठी फार उपयुक्त असते. यामध्ये असणारे सी आणि ई जीवनसत्वे आपल्या त्वचेला नितळ बनवण्यास मदत करत असून, सुरकुत्या घालवण्यसाठीही फायदेशीर ठरू शकते. कोरफडीचा पॅक बनवण्यासाठी, काकडी आणि कोरफडीचा गर समप्रमाणात घ्यावे. यामध्ये थोडे पाणी घालून छान मिश्रण बनवून घ्यावे. आता तयार फेस पॅक चेहऱ्याला लावून रात्रभर तसाच ठेवावा व सकाळी चेहरा पाण्याने स्वच्छ साफ करावा.

 २. हळद

हळदीचे आपल्या शरीराला अनेक फायदे असतात हे माहीत आहे. हळदीच्या वापराने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास आणि रंग उजळण्यास मदत होते असे म्हटले जाते. हळदीचा फेस पॅक तयार करण्यासाठी, थोडी हळद खोबरेल तेलामध्ये मिसळून त्याचे मिश्रण बनवून घ्यावे. हे मिश्रण चेहऱ्याला २० मिनिटांसाठी लावून ठेवून नंतर पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. या फेस पॅकचा वापर एक दिवसाआड करू शकता.

३. दही

दह्याच्या वापरानेदेखील चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या कमी होण्यास मदत होऊन चेहरा हायड्रेट राहतो. दही, ओट्स आणि मध यांचे एक मिश्रण तयार करून ते आपल्या चेहऱ्याला लावून घ्या. हे मिश्रण कोरडे झाल्यानंतर गार पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.

४. पपई

पपई चेहऱ्यावरील डेड स्कीन [मृत त्वचा] काढून टाकण्यास मदत करून, सुरकुत्या कमी करण्याचेदेखील काम करते. चेहऱ्यासाठी फायदेशीर असणाऱ्या पपईचा फेस पॅक कसा बनवायचा ते पाहा. यासाठी अर्धा कप कुस्करलेली पपई, १ चमचा मध आणि २ चमचे दूध यांचे छान मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण १५ ते २० मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. चेहरा व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर त्यावर एखादे मॉईश्चराईझर आणि फेस सिरम लावावे.

५. ऑलिव्ह तेल

ऑलिव्ह तेलाचा वापर चेहऱ्यासाठी केल्याने, ते एजिंगची म्हणजेच चेहऱ्यावर वय दिसण्याच्या प्रक्रियेची गती कमी करण्यास मदत करते असे म्हणतात. रात्री झोपताना ऑलिव्ह तेलाचे काही थेंब आपल्या हातावर घेऊन त्याने चेहऱ्यावर सुरकुत्या असलेल्या भागांवर आणि डोळ्यांभोवती मसाज करावा. तसेच, ऑलिव्ह तेलापासून फेस पॅक बनवायचा असल्यास मध, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेल एका बाउलमध्ये एकत्र करून त्यामध्ये कच्च्या अंड्याचा पिवळा बल्क किंवा अंड्याचा पांढरा भाग घालून सर्व मिश्रण व्यवस्थित मिसळून/फेटून घ्यावे. याचा वापर तुम्ही तुमच्या मानेवर आणि चेहऱ्यावर करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here