“हाच तो पाटला-पाटलांतला फरक”, ईडी चौकशीवरून शिवसेनेचा हल्लाबोल

shivsena-thackeray-faction-criticize-shinde-fadnavis-pawar-government-for-contract-police-recruitment-in-mumbai-news-update
Shivsena-uddhav-thackeray-reaction-on-uniform-civil-code-to-be-imposed-by-central-government-news-update-today

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांची ईडी चौकशी झाली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतरही जयंत पाटलांचा चेहरा हसतमुख होता. यावरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. तसंच, शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ‘कॉर्डिलिया’ क्रूझ प्रकरणात ‘ड्रग्ज’ बाळगल्याच्या आरोपावरून अटक केली. समीर वानखेडे यांनी हे प्रकरण हाताळले होते. परंतु, आता याच प्रकरणावरून समीर वानखेडे सीबीआयच्या जाळ्यात अडकले आहेत. यावरून ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामधून प्रहार करण्यात आले आहेत.

सभ्यता गुंडाळून ठेवली

“कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीला अधिक माहिती हवी आहे व त्यासाठी जयंत पाटील यांना पाचारण केले. ही माहिती ते लेखी स्वरूपातही मागवू शकले असते, पण एकदा त्रास द्यायचा म्हटलं की, सभ्यता गुंडाळून ठेवली जाते. ज्या प्रकरणात जयंतरावांना बोलावले तो काय प्रकार आहे? पण ‘घोटाळा घोटाळा’ म्हणून भुई बडवली जात आहे. या कथित घोटाळ्यांशी संबंधित राजकारणी भाजप परिवारातही असू शकतील, पण त्यांना चौकशीसाठी अशी बोलावणी केली जात नाहीत. तो मान फक्त भाजपपुढे न झुकणाऱ्या विरोधकांचा”, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.

 शिवसेनेचे 40 आमदार उंदरासारखे पळाले

“जयंत पाटील दुपारी बारा वाजता ईडी कार्यालयात गेले व रात्री साधारण दहा वाजता बाहेर पडले. ते हसतमुख होते व त्या रात्री त्यांना सुखाने झोप लागली असेल. निर्भय माणसेही शांत झोपतात. हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत व त्यांनी मध्यंतरी जाहीर केले होते की, ”मला आता शांत सुखाने झोप लागते. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सवाल्यांची भीती आता अजिबात नाही. कारण मी दाराला भाजपचे कडीकोयंडे लावले आहेत!” सांगलीचे भाजप खासदार संजय काका पाटील यांनासुद्धा सुखाने झोप लागत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहेच. काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्याने त्यांच्यावरील ईडी वगैरेंचे बालंट टळले आहे. शिवसेनेचे 40 आमदार ईडी, सीबीआयच्या भयाने उंदरासारखे पळाले. त्यापैकी अनेकांवर चौकश्यांचे समन्स व अटकेचे वॉरंट होते. पक्षांतर करताच भाजपने त्यांना ईडीपासून अभय दिले, पण जे भाजपच्या कुटील कारस्थानाला बळी पडले नाहीत असे छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांसारखे नेते ईडी कारवाईचे बळी ठरले”, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

भाजपामध्ये येण्याकरता जयंत पाटलांवर दबाव

“जयंत पाटील यांनीही भाजपची गुलामी पत्करायचे नाकारले व लगेच त्यांना ईडीचे बोलावणे आले. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजपमध्ये यावे असा त्यांच्यावर दबाव होता अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जयंत पाटील यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारला तेव्हा लगेच ईडीने त्यांना बोलावणे पाठवले व साडेनऊ तास प्रश्नांच्या फैरी झाडल्या. यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ईडीने अनेकांच्या बाबतीत हे घडवले आहे”, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

वानखेडेंचा दरबार व कारभार उघडा पडला

नवाब मलिक यांच्यावरचे गुन्हेदेखील खोटे ठरतील अशी आता स्थिती आहे. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचार, खंडणीखोरी, दहशत वगैरेंचे आरोप पुराव्यांसह केले. शाहरुख खानचा मुलगा आर्यन यास ‘कॉर्डिलिया’ क्रूझ प्रकरणात ‘ड्रग्ज’ बाळगल्याच्या आरोपावरून अटक केली. सुशांतसिंह राजपूतप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला याच पद्धतीने अडकवले होते. अनेक निरपराध्यांचे बळी अशा प्रकारे घेतले. वानखेडेंचा दरबार व कारभार आता उघडा पडला आहे. अशा अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजपचे मुंबईतील भातखळकरांसारखे अनेक उठवळ आमदार त्यावेळी रस्त्यावर उतरून नवाब मलिक यांच्याविरोधात बोंबा मारीत होते. वानखेडे प्रकरणात भाजपच्या अनेक नेत्यांचे हात बरबटले आहेत व त्यांचीदेखील चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

खार येथील एका टिनपाट भाजप नेत्याच्या घरी वानखेडे व त्यांच्या टोळीच्या बैठका चालत व तेथे देण्याघेण्याचे व्यवहार होत. अनेकदा वरिष्ठ भाजप नेते त्या ठिकाणी चहापाण्यासाठी ये-जा करीत असे सांगितले जाते. वानखेडे प्रकरण सरळसाधे नाही. या प्रकरणात भाजप पूर्ण बुडाला आहे, पण जयंत पाटलांची चौकशी करणाऱ्या यंत्रणा या भाजप टोळ्यांची चौकशी करणार काय? अनिल देशमुखांना खोट्या प्रकरणात अडकविण्यासाठी परमबीर सिंग यांचा वापर केला. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्पह्टके ठेवणे, मनसुख हिरेनची हत्या करणे अशा कटांत ज्यांचा थेट सहभाग होता, त्या परमबीर यांना मिंधे-फडणवीस यांच्या सरकारने आता पुन्हा सेवेत घेतले. राज्याचे माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर आरोप करून तुरुंगात पाठवले याचे बक्षीसच परमबीर यांना सध्याच्या सरकारने दिले, असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here