
मुंबई: खासदार संजय राऊत (Mp Sanjay Raut) यांनी दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहित निःपक्ष चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या आरोपांनंतर त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषदे घेत भाजपाचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना लक्ष्य केलं. या घोटाळ्याची कागदपत्रे सोमय्यांकडे चार वेळा पाठवण्यात आली होती. मात्र, त्यांनी या घोटाळ्याची तक्रार करण्यास नकार दिला, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
माझ्याकडे १७ कारखान्यांतील घोटाळ्यांची प्रकरणं आहेत. त्यापैकी हे पहिलं प्रकरण आहे. भीमा साखर कारखान्याचं प्रकरण मी किरीट सोमय्या यांच्याकडे चार वेळा पाठवलं होतं. दौंडचे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते चार वेळा हे प्रकरण त्यांच्याकडे घेऊन गेले, पण त्यांनी याची तक्रार करण्यास नकार दिला. महाविकास आघाडीचं काही प्रकरण असेल तर माझ्याकडे घेऊन, मी ते प्रकरण ईडीपर्यंत घेऊन जाईन, पण या बाकी कोणत्या प्रकरणाला हात लावणार नाही, असं त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलं. अशी अनेक प्रकरणं आहेत, याचा अर्थ काय समजायचा? अशी टीका संजय राऊत यांनी केली.
महाराष्ट्रात आणि देशात एकतर्फी कारभार सुरू आहे. जे भाजपाबरोबर आहेत, त्यांना अभय द्यायचं आणि विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकावायचं, हेच भाजपाचे धोरण आहे, हे स्पष्ट दिसतंय. या व्यवहारातील पैसे नेमके गेले कुठं? हा पैसा शेल कंपन्यांद्वारे भारतात आला का? याच तपास भाजपाची स्वतंत्र तपास यंत्रणा असेलल्या किरीट सोमय्यांनी करायला पाहिजे होता. पण त्यांनी तो केला नाही. ते खेड, दोपालीत जातात. पण जिथे शेतकऱ्यांच्या पैशांची लुटमार सुरू आहे, तिथे हे लोक जात नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
भीमा साखर कारखान्यातील घोटाळ्याचे दोन हजार पानाचे पुरावे आज देवेंद्र फडणवीस यांना मिळतील. पण तरीही मी त्यांना पत्र लिहित ब्रीफ केलं आहे. भविष्यात अशी १७ ते १८ साखर कारखान्याची प्रकरणं मी देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहे, असेही ते म्हणाले.