मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. कोश्यारींनी दळभद्री विधान केलं. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने महाराजांना माफीवीर म्हटलं. आता शिंदे गट कुणाला जोडे मारणार? महाराजांचा एवढा अपमान होत असताना तुम्ही सत्तेला चिटकून कसे? राजीनामा का देत नाही?, असा सवाल करतानाच महाराष्ट्र तुमच्यावर थुंकतोय, जोडे काय असतात ते कसे मारतात हे शिवसेना दाखवून देईन. अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील आदर्श होते,’ असे विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. राज्यपालांच्या विधानानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. काही संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत हटवण्याची मागणी केली आहे. यावरूनच शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘गप्प का?’, असा सवाल विचारला आहे.
संजय राऊत यांनी फेसबूक पोस्ट केली आहे. त्यात म्हटलं की, “महाराष्ट्राचा स्वाभिमान वगैरे शब्दच्छल करीत शिवसेना फोडली. एक स्वाभिमानी मिंधे सरकार सत्तेवर आणले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजपाचे राज्यपाल आणि राष्ट्रीय प्रवक्ते खुलेआम करीत असताना स्वाभिमानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गप्प का? इथे बदला घ्या बदला,” असे संजय राऊत म्हणाले आहेत.
राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले?
“तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत,” असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलत होते.