मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार शुभांगी पाटील व नागपूर शिक्षक मतदारसंघातून सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. नाशिक मतदारसंघातील घटनांमुळे डॉ. सुधीर तांबे (Dr.Sudhir Tambe) यांना पक्षाने आधीच निलंबित केले असून सत्यजित तांबेना (satyajeet Tambe) सहा वर्षासाठी निलंबित कऱण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत समन्वय असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रीत चर्चा करून नाशिक व नागपूर मतदार संघाबाबत निर्णय घेतलेला आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसची उमेदवारी दिली असतानाही त्यांनी पक्षाशी बेईमानी करत अर्ज दाखल केला नाही त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला व नागपूरमध्ये काँग्रेस पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांना मविआचा पाठिंबा आहे.
विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नागपूरमधून सुधाकर अडबाले, अमरावतीमधून धीरज लींगाडे, औरंगाबादमधून विक्रम काळे, नाशिकमधून शुभांगी पाटील व कोकणमधून बाळाराम पाटील असतील. विधान परिषदेच्या या पाचही जागांवर महाविकास आघाडीतील पक्ष कार्यकर्ते एकदिलाने काम करून या पाचही जागा विजयी करतील.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यास काँग्रेस पक्षाचा पाठिंबाच आहे म्हणून तर काँग्रेसशासित राजस्थान, छत्तिसगड व हिमाचल प्रदेशात जुनी पेन्शन योजना लागू केली आहे परंतु भाजपाशिसत राज्यात ही योजना लागू केली जात नाही. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये या मुद्द्यांवरून भाजपाविरोधात तीव्र संताप आहे. महागाई, बेरोजगारी हे मुद्देही महत्वाचे आहेत. नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला उमेदवारही मिळाला नाही. भाजपा हा दुसऱ्यांची घरे फोडणारा पक्ष असून पाठीमागून वार करणाऱ्या भाजपाला जनताच धडा शिकवेल.
या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते व विधान परिषदचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व माजी आमदार उल्हास पवार आदी उपस्थित होते.