मुंबई : अभिनेता शाहरुख खान याच्या वाहन चालकाचे निधन झाले. मोहन डोंगरे यांचा किडनीच्या विकारामुळे मृत्यू झाला. ( Shahrukh Khan Driver from Akola Mohan Dongre Dies) मोहन डोंगरे हे अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील मौजे गोरव्हा येथील रहिवासी होते. जवळपास तीस वर्षांपासून ते खान परिवाराचे सदस्य झाले होते.
मोहन डोंगरेंनी रोजगारासाठी वयाच्या 14 व्या वर्षी अकोला सोडून मुंबई गाठली होती. रोजगाराच्या शोधात ते मुंबईत स्थायीक झाले होते. 1989 मध्ये एका जाहिरातीच्या माध्यमातून मोहन डोंगरे यांची शाहरुख खानशी ओळख झाली. तेव्हापासून वाहन चालक म्हणून शाहरुखच्या कुटुंबाकडे कामाला लागले. जवळपास तीस वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत होते.
शाहरुखने मोहन यांचा ‘शूमाकर’ असा केला होता उल्लेख, शाहरुखचं नोव्हेंबर 2012 चा ट्वीट
शाहरुखचं नोव्हेंबर 2012 मध्ये एक ट्वीट केले होते. त्यात त्याने मोहन यांचा ‘शूमाकर’ असा उल्लेख केला होता. “डोक्यावर सूर्य तळपतो आहे. रेडिओवर सेल्फ कंट्रोल आहे आणि माझा माणूस मोहन (शूमाकर) स्टेअरिंगवर आहे” असे ट्वीट शाहरुखने केले होते.
तीन वर्षांपासून मोहन डोंगरे यांना होता किडनीचा आजार
दुर्दैवाने गेल्या तीन वर्षांपासून मोहन डोंगरे यांना किडनीचा आजार झाला होता. गेल्या काही दिवसात त्यांचा आजार बळावला. त्यातच 25 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. खान परिवाराने मोहन डोंगरे यांच्यावर सर्व उपाचाराचा खर्च केला परंतु त्यांना त्यामध्ये यश मिळाले नाही.






































































































































