भाजपला पवारांच्या बारामतीत ‘विजयाचा रथ’ रोखणे अशक्य!

Sharad pawar bjp baramati mission blog
Sharad pawar bjp baramati mission blog

भाजपने शरद पवारांच्या बालेकिल्ल्याकडे आपला मोर्चा वळवला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याने मंगळवारी ‘मिशन बारामती’ची सुरुवात झाली. शरद पवार ज्या कनेरी गावातून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करतात तेथील हनुमान मंदिरातून भाजप आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. १९६७ साली शरद पवारांनी याच मंदिरातून नारळ फोडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांच्या विजयाचा सिलसिला सुरू झाला आहे. तेव्हापासून अखंडपणे पवार कुटुंबियांचा विजय होताना पाहायला मिळत आहे. पवारांनी प्रत्येक व्यक्तीशी जी नाळ जोडून ठेवली आहे, ती तोडणे भाजपाला कधीही जमणार नाही.

आगामी २०२४  च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, विरोधकांच्या बालेकिल्ल्यातून भाजपने आपल्या मिशनची सुरुवात केली आहे. त्यात शरद पवारांचा बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपकडून कसोसीने प्रयत्न केले जात आहेत. भाजपने मिशन बारामतीची सुरुवात केली असून, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण देखील तीन दिवस बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधी चंद्रशेखर बावनकुळे हे बारामती दौऱ्यावर आहेत. परंतु पवारांनी त्यांच्या ५० वर्षांच्या राजकारणात जी माणसे जोडली. बारामतीसाठी खूप काही केले. त्यामुळे पवार कुटुंबियांचा विजयाचा रथ रोखणे सोपे नाही.    

हेही वाचा: Narendra Modi : नरेंद्र मोदींचे मन अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप;शिवसेनेचा सामनातून हल्लाबोल

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे संघटन मजबूत करणे, तसेच संघट शक्ती वाढवणे या दृष्टीने ही लोकसभा प्रवास योजना आहे. रात्री १० वाजेपर्यंत बारामतीच्या विविध भागात प्रवास करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बारामतीसाठी पूर्णवेळ प्रभारी असून पुढच्या १८ महिन्यात त्या पाच ते सहा वेळा बारामतीत येऊन प्रत्येक वेळी तीन दिवस मुक्कामी असणार आहे. परंतु त्याच्यातून काहीही साध्य होणार नाही. पवारांचे राजकारण भल्या भल्यांना कळाले नाही. त्यामुळे त्यांचा नाद न केलेलाच बरा.

शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय भाजपची राजकीय दुकानदारी चालू शकत नाही. पवारांवर टीका केले की माध्यमांमध्येही त्याची दखल घेतली जाते आता हे अधोरेखित झाले आहे. त्यासाठी नरेंद्र मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत पवारांचे नाव घ्यावेच लागते. भाजपकडे मुद्दे नाही त्यामुळे पवारांवर टीका करायची आणि प्रसिध्दी मिळवायची. परंतु पवार हे चांगल्या चांगल्यांना पाणी पाजतात हे भाजपच्या संधीसाधू टोळक्याने ध्यानात ठेवावे.

कृषी विज्ञान प्रतिष्ठान संस्था, औद्योगिक वसाहत, रेल्वे स्टेशन, एम आय डी सी, इंदापूर पंचतारांकित एमआयडीसी हिंजवडी येथील देशातील पहिला आयटी पार्कसह, शैक्षणिक, औद्योगिक, कृषी अशा विविध क्षेत्रात बारामती, पुण्यात पश्चिम महाराष्ट्रात, महाराष्ट्रात पवारांनी जी उभारणी केली ती अविस्मरणीय आहे. हजारो लाखो लोकांना रोजगार दिला. जी प्रगती केली ती कुणीही करु शकणार नाही. पवारांनी यासाठी आपले आयुष्य खर्ची केले. देशाच्या राजकारणात जो दरारा निर्माण केला. जी ओळख आहे ती कामाच्या भरवश्वार केली आहे. हे भाजपने विसरु नये.

येत्या दोन महिन्यात बावनकुळे राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यात जाणार आहे. पुढच्या काळात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा तसेच विधानसभा या निवडणुकांमध्ये शिंदे गट आण भाजप मिळून निवडणूक लढवणार आहे. असे भाजपने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात ४५ च्या पुढे लोकसभा आणि २०० च्या पुढे विधानसभेच्या जागा जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. शेवटी सर्व काही मतदारांच्या हाती असते. त्यामुळे कोण बाजी मारणार कुणाचा गेम होणार हे निवडणुकीच्या निकालांवरून स्पष्ट होते.  

लेखिका:मेहराज पटेल (राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या औरंगाबाद शहराध्यक्षा आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here