शिर्डी : शिर्डीच्या (Shirdi) साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साई दर्शनासाठी (Shirdi sai baba darshan) आता नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) तसेच ओमिक्रॉन (Omicron) संकट निर्माण झाले आहे. कोरोनासह ओमिक्रॉन रुग्णांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर साई दर्शनासाठी असलेल्या पूर्वीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय शिर्डी संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार आता भक्तांना सकाळी सहा ते रात्री नऊ याचदरम्यान साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे.
ही आहे नवी नियमावली
जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर दर्शन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या नियमावलीनुसार आता भक्तांना सकाळी सहा ते रात्री नऊ याच कालावधीमध्ये साईबाबांचे दर्शन घेता येणार आहे. रात्री नऊ नंतर राज्यात जमावबंदीचे आदेश लावण्यात आले आहेत, जमावबंदीचे आदेश असल्याने रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मंदीर दर्शनासाठी बंद असेल. पहाटेच्या काकड आरती आणि शेजारतीला देखील भक्तांना प्रवेश देण्यात येणार नाही. मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्येच काकड आरती होणार आहे. तसेच मंदिर परिसरात भक्तांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत असे आवाहन देखील मंदिर आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यात जमावबंदी
राज्यात हळूहळू कोरोना रुग्णाच्यां संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील राज्यात शिरकाव केला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रशासनाकडून जमावबंदीचे आदेश लागून करण्यात आले आहेत. रात्री 9 ते पहाटे 6 पर्यंत राज्यात जमावबंदी असणार आहे. या काळात पाच पेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास कारवाई होऊ शकते. तसेच नववर्षांच्या पार्श्वभूमीवर देखील अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोना संकट पहाता नववर्षांच्या मोठ्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे.