संजय राऊतांना पुन्हा ‘ही’ मोठी जबाबदारी

शिवसेनेच्या ‘या’ दहा प्रवक्त्यांचीही नेमणूक करण्यात आली

shivsena-press-conference-at-sena-bhavan-today-latest-update-mp-sanjay-raut-talk-on-three-and-half-men-of-bjp-news-update
shivsena-press-conference-at-sena-bhavan-today-latest-update-mp-sanjay-raut-talk-on-three-and-half-men-of-bjp-news-update

मुंबई : विरोधकांवर रोखठोकपणे शब्दांचे बाण सोडणारे राज्यसभा सदस्य, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोठी जबाबदारी सोपवली. राऊत यांची पुन्हा एकदा पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळं यापुढील काळातही राऊत हे विरोधकांवर बरसताना दिसणार आहेत.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात संजय राऊत हे मुख्य प्रवक्ते आहेत. त्याशिवाय, अन्य दहा प्रवक्त्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर यांचा अन्य प्रवक्त्यांमध्ये समावेश आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. रोखठोखपणे राऊत हे पक्षाची भूमिका मांडत असतात. राज्यसभेवर खासदार असल्यानं दिल्लीतील घडामोडींवरही त्यांचं लक्ष असतं. अनेक पक्षांमध्ये त्यांचे मित्र आहेत. राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांशीही त्यांची जवळीक आहे. पक्षाची भूमिका मांडताना त्यांना त्याचा अनेकदा फायदा होतो.

संजय राऊत हे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक आहेत. ‘सामना’तूनही पक्षाची भूमिका ते बिनधास्त मांडत असतात. त्यामुळं शिवसेना सतत देशपातळीवर चर्चेत असते.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here