
औरंगाबाद : शिवसेनेचे नेते माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहे. या दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही. दरम्यान औरंगाबादेतील प्रजासत्ताकदिनाच्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमातही दोन्ही गटातील नेत्यांमधील वाद काहीवेळ पुन्हा रंगला.
शुभेच्छा न घेताच निघाले
शिंदे गटाचे नेते औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या शुभेच्छा न स्वीकारताच ठाकरे गटाचे नेते कार्यक्रमस्थळावरून निघून गेले. तर घटनाबाह्य पालकमंत्री असल्याची टीकाही खैरे यांनी केली. यानंतर त्यांच्या टीकेला भुमरे यांनी उत्तर दिले आहे.
नेमका काय घडला प्रकार?
प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा मुख्य ध्वजवंदन आज पोलिस आयुक्त कार्यालयातील ‘देवगिरी’ मैदानावर पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमानंतर प्रथेप्रमाणे पालकमंत्री भुमरे सर्व नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले. भुमरे येत असतानाच माजी खासदार चंद्रकांत खैरे तेथून निघून गेले.
हे सरकार घटनाबाह्य – खैरे
याबाबत चंद्रकांत खैरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधी यांनी विचारणा केली असता, ‘हे सरकार घटनाबाह्य असल्याच सांगत, केवळ मी राष्ट्रध्वजाला वंदन केले, सॅल्यूट केला. पण मी बंडखोरांना बोललो नाही. शब्दही बोललो नाही, कारण त्यांना शिवसेनाप्रमुखांनी, उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली पण त्यांनी पैशांसाठी गद्दारी केली.
संदीपान भुमरेंचे उत्तर
प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमात भुमरे यांच्या शुभेच्छा न स्वीकारता, घटनाबाह्य सरकार म्हणून खैरे यांनी उल्लेख केला असल्याच्या कृतीवर भुमरे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, खैरे यांनी मला घटनाबाह्य पालकमंत्री सांगण्याचे अधिकार खैरे यांना कोणी दिली. आम्हाला घटनाबाह्य ठरवायला खैरे काही सुप्रीम कोर्ट आहेत का? खैरे काहीही बोलत असतात. सद्या जे काही चालले, ते त्यांना सहन होत नसल्याने खैरे अशाप्रकारे वक्तव्य करतात. यापूर्वी देखील ध्वजवंदन होण्यापूर्वी ते निघून गेले होते. त्यामुळे त्यांना सवयच आहे.
दानवेंकडूनही खैरेंची पाठराखण
चंद्रकांत खैरे यांच्या या भूमिकेची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाठराखण केली. ते म्हणाले, हे सरकार घटनाबाह्यच आहे. तर खैरे एका महत्त्वाच्या कामानिमित्त गेल्याचे सांगत दानवे यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.