मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या (BJP) काही नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटीगाठी वाढल्याने महाराष्ट्रात भाजपा-मनसेची युती होईल, अशा चर्चांना उधाण आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील (Amit Shah) मुंबई दौऱ्यात युतीसंदर्भात बोलणी करण्यासाठी राज ठाकरेंना भेटणार असल्याचंही बोललं जात आहे. या सर्व घटनाक्रमानंतर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सत्तेसाठी लाचारी करत आहेत. त्यांना ज्यांनी शिव्या घातल्या त्यांचीच गळाभेट ते घेत आहेत. त्यांचा हिंदुत्वाचा मुखवटा गळून पडला आहे, अशी टीका कायंदे यांनी केली आहे. त्या मुंबईत एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होत्या.
मनसे- भाजपा युतीबाबत विचारलं असता कायंदे म्हणाल्या की, “राज ठाकरे यांनी २०१४, २०१९ मध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भाजपावर सडकून टीका केली होती. आता त्यांनी सत्तेसाठी लाचारी पत्करली आहे. ज्या लोकांनी त्यांना शिव्या घातल्या, त्यांच्याकडे जाऊन ते सत्तेसाठी हातमिळवणी करत आहेत, गळाभेट घेत आहेत. हे सगळं महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय. त्यांचा हिंदुत्वाचा मुखवटा गळून पडला आहे. त्यामुळे असली कोण आणि नकली कोण? हेही महाराष्ट्राला कळालं आहे.”
राज्यातील या घडामोडींमागे भाजपाचा सहभाग आहे का? असं विचारलं असता मनीषा कायदे म्हणाल्या की, “त्यांची स्क्रीप्ट कुठून येतेय? हे सर्वांना दिसत आहे. त्यामुळे आम्ही कशाला यावर बोलून दाखवायचं. रस्त्यावरील शेंबडं पोरगंही ओळखतंय स्क्रीप्ट कुठून येतेय.”
भारतीय जनता पार्टीने काश्मीरमध्ये पीडीपीबरोबर सत्ता स्थापन केली, हे त्यांचं हिंदुत्व आहे. ज्या नितीशकुमारांनी सांगितलं की आरएसएसवर बंदी घाला, त्यांच्याबरोबर भाजपानं बिहारमध्ये युती केली, हे त्यांचं हिंदुत्व आहे. भारतीय जनता पार्टीने कुणाबरोबरही युती केली तर ती नैसर्गिक युती असते. पण शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती केली तर ती अनैसर्गिक युती मानली जाते. हा त्यांचा ढोंगीपणा असून महाराष्ट्र त्यांचा ढोंगीपणा ओळखून आहे, अशी टीकाही कायंदे यांनी यावेळी केली.