![]shivsena-leader-sushma-andhare-criticize-mns-chief-raj-thackeray-in-mulund-speech-news-update-today shivsena-leader-sushma-andhare-criticize-mns-chief-raj-thackeray-in-mulund-speech-news-update-today](https://freepressindia.in/wp-content/uploads/2022/11/15-2-696x392.jpg)
मुंबई: शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं. त्या गुरुवारी (१ नोव्हेंबर) मुलुंडमधील महाप्रबोधन सभेत बोलत होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो. ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात.”
“मी मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटरही होईन”
“दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली.
“मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात”
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “खरंतर मला त्या माणसावर बोलावंसं वाटत नाही. आमचे देवेंद्र भाऊ किती छान बोलतात. मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात. कारण त्यांना माझ्यापेक्षा चांगलं सुचतं.”
“मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा”
“ते म्हणाले की, मतदार नसलेली सेना. मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा आणि काय होतं पाहा. मतदारमधील ‘म’, नसलेलीमधील ‘न’ आणि सेनेमधील ‘से’ काढला की काय होतं? मी काहीच म्हणत नाही. मी अतिशय गरीब लेकरू आहे, त्यात अजिबात पडत नाही,” असं अंधारे यांनी म्हटलं.
“आता उमेदवार नसलेली सेना इथपर्यंत प्रवास”
“आता मतदार नसलेल्या सेनेचा उमेदवार नसलेली सेना इथपर्यंत प्रवास झाला आहे. अशी परिस्थिती होऊनही त्यांना बोलावंसं वाटतं,” असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.