अदानी घोटाळ्यात भाजपचा थेट संबंध,संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

संजय राऊत म्हणाले, देशात गेल्या 50 वर्षांत असा स्कॅम झाला नाही. या घोटाळ्याशी सत्ताधारी पक्षाचा थेट संबंध आहे. या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक सरकारला जाब विचारणार आहेत.

Shivsena-mp-sanjay-raut-on-gautam-adani-bjp-shiv-sena-news-update
Shivsena-mp-sanjay-raut-on-gautam-adani-bjp-shiv-sena-news-update

नवी दिल्ली: उद्योगपती गौतम अदानी (Gautam adani) यांचा सध्या जो एक घोटाळा समोर येत आहे, त्यामध्ये सत्ताधारी पक्ष भाजपचा थेट संबंध आहे, असा गंभीर आरोप शिवसेना खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, देशात गेल्या 50 वर्षांत असा स्कॅम झाला नाही. या घोटाळ्याशी सत्ताधारी पक्षाचा थेट संबंध आहे. या मुद्द्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक सरकारला जाब विचारणार आहेत.

एकाही भाजप नेत्याने आवाज उठवला नाही

संजय राऊत म्हणाले, भाजप नेत्यांकडून नेहमी विरोधकांवर मनी लाँड्रिंग, शेल कंपन्यांचा आरोप केला जातो. विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआयच्या धाडी लावल्या जातात. आताही एका उद्योजकाच्या सिंगापूर, मॉरिशस येथे शेल कंपन्या असल्याचे समोर येत आहे. यावर एकाही भाजप नेत्याने अद्याप आवाज का उठवला नाही? केवळ विरोधकांवर आरोप करुन त्यांना कैदेत ठेवण्यासाठीच तुरुंग बनवले आहेत काय?

 आज संसदेत आवाज उठवणार

संजय राऊत म्हणाले, आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या दालनात विरोधकांची बैठक होत आहे. या बैठकीत अदानी घोटाळ्यावरुन सरकारला घेरण्याची रणनिती बनवण्यात येणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक आवाज उठवणार आहेत.

सामान्यांच्या पैशांचे काय?

संजय राऊत म्हणाले, शेअर मार्केटवरुन देशाचा विकास अधोरेखित करण्याचा कट रचला जात आहे. खरे तर शेअर मार्केट आणि सामान्यांचा काही संबंध नाही. सामान्यांनी मोठ्या विश्वासाने आपले पैसे एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडियात गुंतवले आहेत. मात्र, हे सरकार या पैशांचा शेअर मार्केटमध्ये इतरांसाठी वापर करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अदानीसारखे घोटाळे समोर आल्यानंतर सामान्यांच्या पैशांचे काय?, याचा जाब आम्ही सरकारला विचारणार आहोत. भाजप देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त करण्याचे काम करत आहे.

शिक्षक, पदवीधर निवडणूक मविआच जिंकणार

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांचे निकाल आज लागणार आहेत. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यावर संजय राऊत म्हणाले, पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील. गेल्या निवडणुकीत मविआचे जेवढे उमेदवार होते, त्यापेक्षा अधिक शिक्षक, पदवीधर आमदार आता असतील.

मुंबईला हलवाभर चमचाही मिळाला नाही

केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, मुंबई व महाराष्ट्रासाठी आम्ही अनेक मागण्या केल्या होत्या. मात्र, चमचाभर हलवाही वाट्याला आला नाही. हे पूर्णपणे भाजपच्या निवडणुकीचे बजेट होते. मुंबईचे औद्योगिक अध:पतन करण्याचे कारस्थान, या बजेटमधून समोर येत आहे. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here