
मुंबई: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वर्ष २०१९ मध्ये पहाटे शपथ घेत 79 तासांचं सरकार स्थापन केलं होतं. यानंतर मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणावर काल देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच सरकार स्थापन झालं होतं, असं ते म्हणाले. दरम्यान, फडणवीसांच्या विधानाचा आज खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. फडणवीस हे जगातलं दहावं आश्चर्य असल्याचं ते म्हणाले. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संजय राऊत?
देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून ज्याप्रकारची वक्तव्य येत आहे. त्यावर असून वाटतं की देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहे. आधीच ८ आश्चर्य या जगात आहेत. आणखी दोन आश्चर्य दिल्लीत आहे आणि एक आश्चर्य महाराष्ट्रात आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
माणसाने किती खोटं बोलावं याला मर्यादा असतात, मुळात तुम्ही विश्वासघात केल्याने हे घडलं. देवेंद्र फडणवीसांनी आधी त्यांची जुनी वक्तव्य काढून बघावी. ते स्वत: अमित शाहांसमोर काय बोलले होते? त्यामुळे स्वत:च विश्वासघात केल्यानंतर आता गळा काढण्यात काय अर्थ आहे, असेही ते म्हणाले.
उद्या फडणवीस म्हणतील की सहा महिन्यापूर्वी जी बंडखोरी झाली ती शरद पवारांच्या सांगण्यावरून झाली. एका वैफल्यातून ते बोलत आहेत. राज्यात त्यांच्या सरकारविषयी तिरस्कार आहे. विधानपरिषेदेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आहे. पुण्याच्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभव दिसतो आहे. त्यामुळे ते अशी विधानं करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
अजित पवार ठामपणे महाविकास आघाडीसाठी वातावरण निर्माण करत आहेत आणि भाजपाला आव्हान देत आहेत. तेव्हा आमच्या सर्वाच्या प्रतिमांना तडे देण्यासाठी अशी खोटी विधानं सुरू आहे. मात्र, तरी लोकांचा विश्वास बसणार नाही. पहाटेच्या शपथविधीमुळे त्यांना अजूनही दचकून जाग येते. त्यांनी आता स्वत:वर उपचार करून घेतले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.