बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत : संजय राऊत

shivsena-mp-sanjay-raut-suggestion-modi-government-over-bangladesh-hindu-attack-news-update
shivsena-mp-sanjay-raut-suggestion-modi-government-over-bangladesh-hindu-attack-news-update

मुंबई: ज्या भारताने जगाच्या नकाशात बांगलादेश नावाच्या नवीन राष्ट्राला स्थान मिळवून दिले, त्याच बांगलादेशातील धर्मांध मुस्लिमांनी हिंदू धर्मीयांवर हल्ले चढवून, हिंदूंची हत्याकांडे घडवूनभारताचे उपकाराचे असे पांग फेडावेत, हे संतापजनक आहे. इनफ इज इनफ …असा कठोर संदेश देऊन बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी केंद्रीय सरकारने तातडीने पावले उचललीच पाहिजेत, अशी मागणी आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

ज्यांनी तुमच्यावर उपकार केला, त्यांचे असे पांग फेडणार

बांगलादेशात गेले आठ-दहा दिवस हिंदू धर्मीयांवर धर्मांध मुस्लिमांनी जे अमानुष हल्ले चढविले ते अस्वस्थ करणारे तर आहेतच, पण चीड आणणारेही आहेत. ज्या बांगलादेशची हिंदुस्थानने पाकिस्तानच्या राक्षसी अत्याचारांतून सुटका केली आणि ‘पूर्व पाकिस्तान’ हे नाव कायमचे बदलून ‘बांगलादेश’ नावाचे नवे बाळ जन्माला घातले, त्या भारताचे आणि हिंदू धर्मीयांचे बांगलादेशातील धर्मांध मुस्लिमांनी असे पांग फेडावेत, याला काय म्हणावे?

धर्मांध मुस्लिमांचे हिंदूंवर अन्याय अत्याचार

आठवडाभरापूर्वी बांगलादेशातील हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव असलेली दुर्गापूजा सुरू झाल्यापासून वीसहून अधिक जिह्यांत तेथील धर्मांध मुस्लिमांच्या जमावाने हिंदूंवर ठरवून हल्ले सुरू केले. हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करण्यात आली. जिहादी मानसिकतेने बेभान झालेल्या मुस्लिम जमावांनी अनेक मंदिरांना आगी लावल्या. हिंदू वस्त्यांमध्ये घुसून शेकडो घरांची तोडफोड केली. सशस्त्र हल्ले चढवून अनेक हिंदूंना भोसकण्यात आले. त्यात आतापर्यंत वीस हिंदूंचा बळी गेला असून अजूनही हिंदूंचे मृतदेह सापडत आहेत.

संख्येने अत्यल्प असल्यामुळे हिंदूंकडून प्रतिकारही होणे शक्यच नव्हते. बांगलादेशातील हिंदूंची कुठलीही चूक नसताना किंवा तेथील हिंदू धर्मीयांनी कुठलीही आगळीक केली नसताना कटकारस्थान रचून एक ‘फेक न्यूज’ बनविण्यात आली आणि आधीच ठरविल्याप्रमाणे हिंदूंवर हल्ले सुरू झाले.

धर्मांध माथेफिरूंनी ठरवून घातपात केला

बांगलादेशातील सत्तारूढ अवामी लीगच्या पंतप्रधान शेख हसीना आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या विरोधी पक्षनेत्या खलिदा झिया यांच्यातील राजकारणात बांगलादेशातील हिंदू अकारण भरडला जात आहे. आताही तेच झाले. बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदू समाज ठिकठिकाणी पेंडॉल उभारून दुर्गापूजेचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करत असताना काही धर्मांध माथेफिरूंनी ठरवून घातपात केला.

खोट्या बातमीवरुन अफवा, हिंदूंवर हल्ले

एक खोट्या बातमीने आणि त्यावरून पसरविल्या गेलेल्या अफवांमुळे बांगलादेशातील अनेक मंदिरे, हिंदूंची घरेदारे उद्ध्वस्त झाली. दगडफेक आणि जाळपोळींच्या घटनांमुळे जीव वाचविण्यासाठी हजारो हिंदू धर्मीय घरेदारे सोडून पळून गेले आहेत. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे. गेल्या काही वर्षांत हिंदूंच्या मंदिरांवर आणि वस्त्यांवर हल्ले चढविण्याचे प्रकार तिथे सातत्याने घडत आहेत. हिफाजत-ए-इस्लाम नावाची धर्मांध संघटना जमातचे कार्यकर्ते आणि खलिदा झियांच्या अवामी लीगचे कार्यकर्ते वारंवार कारस्थाने रचून असे हल्ले घडवीत आहेत.

इंदिरा गांधींनी बांगलादेशची निर्मिती केली, मग असे पांग फेडणार

1971 साली पाकिस्तानी सैन्याने आपल्याच देशातील पूर्व पाकिस्तानवर हल्ला चढवून तेथील जनतेची अमानुष कत्तल केली. 30 लाख बांगलादेशी मारले गेले. हिंदुस्थानच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सैन्य पाठवून पाकिस्तानला पराभूत केले. पाकिस्तानच्या जुलूम आणि अत्याचारातून कायमची सुटका करत इंदिरा गांधींनी बांगलादेशची निर्मिती केली.

ज्या हिंदुस्थानने जगाच्या नकाशात बांगलादेश नावाच्या नवीन राष्ट्राला स्थान मिळवून दिले, त्याच बांगलादेशातील धर्मांध मुस्लिमांनी हिंदू धर्मीयांवर हल्ले चढवून, हिंदूंची हत्याकांडे घडवून हिंदुस्थानचे आणि हिंदू धर्मीयांच्या उपकाराचे असे पांग फेडावेत, हे संतापजनक आहे.

हिंदूंना वाचविण्यासाठी केंद्रीय सरकारने तातडीने पावले उचललीच पाहिजेत

पुन्हा गेले वर्षभर हिंदुस्थानात बांगलादेशच्या निर्मितीचा सुवर्णमहोत्सव साजरा केला जात असताना तिकडे बांगलादेशात मात्र हिंदूंचे शिरकाण सुरू आहे. ‘हेचि फळ काय मम तपाला..?’ म्हणावे अशी दुर्धर अवस्था आज हिंदुस्थानवर ओढवली आहे. इनफ इज इनफ… असा कठोर संदेश देऊन बांगलादेशातील हिंदूंना वाचविण्यासाठी केंद्रीय सरकारने तातडीने पावले उचललीच पाहिजेत!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here