उत्तर प्रदेशात प. बंगालसारखी गत होऊ नये, म्हणून सगळेच कामाला लागले

शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

shivsena-saamana-editorial-bjp-uttar-pradesh-election-ganga-river-covid-19-bjp-news-update
shivsena-saamana-editorial-bjp-uttar-pradesh-election-ganga-river-covid-19-bjp-news-update

मुंबई l मोठा गाजावाजा करूनही भारतीय जनता पक्षाला प. बंगालात विजय मिळवता आला नाही. स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे भाजपचे बंगालातील स्टार प्रचारक. हिंदुत्वाच्या नावावर तेथे धार्मिक, सामाजिक विभाजन करता आले नाही. त्यामुळे हे ‘टुलकिट’ अपयशी ठरले. आता उत्तर प्रदेशातही प. बंगालसारखी गत होऊ नये, म्हणून सगळेच कामाला लागले आहेत.Shivsena-saamana-editorial-bjp-uttar-pradesh-election-ganga-river-covid-19-bjp-news-update

कोरोनाशी लढाई व लोकांसाठी जीवन यज्ञ महत्त्वाचा नसून पुन्हा एकदा निवडणुकांनाच प्राधान्य मिळत आहे अशी खंत शिवसेनेने सामना संपादकीयमधून व्यक्त केली आहे. “वास्तविक, निवडणुका मागेपुढे झाल्याने काही आकाश कोसळणार नाही. सध्या संपूर्ण लक्ष कोरोनाच्या लढाईकडेच देणे गरजेचे आहे. नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल. जगात आपली नाचक्की होईल,” असा इशाराच शिवसेनेने दिला आहे.

“पश्चिम बंगालचे मिशन अपयशी ठरल्यावर मोदी-शहा व योगी यांनी मिशन उत्तर प्रदेश हातात घेतले आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी मोदी-शहा यांनी एकत्रित चिंतन केले. साधारण वर्षभराने उत्तर प्रदेशसह इतर चारेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका होतील. त्यामुळे भाजपा कामास लागला आहे.

प. बंगालातील निवडणुकीत तेथील जनतेने ‘वळकटी’ बांधायला लावली. आता ही वळकटी उत्तर प्रदेशात पसरायची तयारी सुरू झाली आहे. देशातील सर्व प्रश्न संपले आहेत. काही शिल्लकच नाही. त्यामुळे फक्त निवडणुका जाहीर करणे, लढणे व मोठमोठय़ा सभा, रोड शो करून त्या जिंकणे हे एवढेच काम आता उरले आहे की काय?,” अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.

“संसदीय लोकशाहीत निवडणुका अटळ आहेत, पण सध्याचे वातावरण निवडणुकांसाठी योग्य आहे काय? प. बंगालसह चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या संदर्भातही वातावरण कोरोनामुळे गढूळ झाले होते. निवडणुका तूर्त स्थगित तरी करा किंवा प. बंगाल, आसामसारख्या राज्यांच्या निवडणुका एका टप्प्यात घ्या, अशी मागणी होत राहिली.

मात्र प. बंगालची निवडणूक आठ टप्पे होईपर्यंत लांबवली गेली. त्यामुळे फक्त बंगालच नाही तर देशभरातच कोरोनाचा प्रसार झाला. याबाबत निवडणूक आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला फासावर का लटकवू नये? असा संताप मद्रास हायकोर्टाने व्यक्त केला. आता उत्तर प्रदेशच्या बाबतीतही तीच चूक केंद्र सरकार करीत आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“उत्तर प्रदेशातील लोकसभा जागांचा आकडा सत्तर पार आहे. या आकडय़ानेच मोदी-शहांना दिल्लीचे सत्ताधीश बनविले. मागच्या लोकसभेत प. बंगालमध्ये भाजपने लोकसभेच्या 18 जागा जिंकल्या. 2024 साली यापैकी चार जागा जिंकल्या तरी भरपूर असे बंगालचे सध्याचे वातावरण दिसते. उत्तर प्रदेशातही कोरोनासंदर्भातले व्यवस्थापन कोसळले. त्यात पश्चिम उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलन भाजपसाठी अडचणीचे ठरत आहे. अशा वातावरणात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो.

उत्तर प्रदेशात कोरोनाचे संकट भयंकर आहेच. ही राष्ट्रीय आपत्तीच आहे. असे मान्य केल्यावर उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, गुजरातसारख्या मोठय़ा राज्यांना महामारीचा फटका बसणारच. तसा तो बसलाच आहे, पण उत्तर प्रदेशातील परिस्थितीने जगाचे डोळे पाणावले आहेत. गंगेत मृतदेह वाहत येत आहेत.

कानपूरपासून पाटण्यापर्यंत गंगाकिनारी प्रेतांचे ढीग लागत आहेत. तेथेच त्यांचे दफन व दहन करावे लागत आहेत. त्याची विदारक छायाचित्रे जगभरच्या मीडियाने छापल्याने मोदी व उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेस तडे गेले. आता बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी व उत्तर प्रदेश निवडणुका जिंकण्यासाठी काय करायचे, यावर चिंतन तसेच मंथन सुरू झाले आहे.

गंगेतील पात्रात वाहत आलेल्या मृतदेहांना पुन्हा जिवंत करता येणार नाही. यावेळी तर या मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यासाठीही संघ परिवाराचे स्वयंसेवकही पुढाकार घेताना दिसले नाहीत. वाराणसीत तर प्रेते जाळायला स्मशानात रांगाच रांगा लागल्या. हे सर्व चित्र वर्षभरात येणाऱ्या निवडणुकीत त्रासदायक ठरू शकते,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

हेही वाचा: Hypotension: लो-ब्लड प्रेशर है बेहद खतरनाक, जानें कारण और निवारण

“महिनाभरापूर्वी झालेल्या त्या राज्यातील पंचायत तसेच जिल्हा परिषद निवडणुकांत भाजपची कामागिरी निराशाजनक झाली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील मथुरा, मेरठ, बागपत या ‘जाट’ प्रभावी प्रदेशात तर भाजपचा दारुण पराभव झाला. हे चित्र म्हणजे भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन कोरोना काळात करून घेतले गेले, पण त्या भूमिपूजनावर गंगेत तरंगणारे मृतदेह भारी पडत आहेत.

अयोध्या आंदोलनात करसेवकांवर बेछूटपणे गोळय़ा चालवल्या गेल्या व शरयूच्या पात्रात अनेक साधू-संतांचे मृतदेह तेव्हा तरंगत होते. हिंदुत्ववाद्यांच्या रक्ताने लाल झालेल्या शरयूचा प्रवाह पाहून देशातील हिंदू समाजाचे रक्त तेव्हा उसळले होते. त्यातूनच केंद्रात भाजपची सत्ता आली. पण त्याच गंगेत आज हिंदूंचे मृतदेह बेवारस अवस्थेत तरंगत आहेत. हे मृतदेहच भारतीय जनता पक्षाला व त्यांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिमांना राजकीय पराभवाकडे ढकलत आहेत,” असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here