Shraddha walker Murder Case : श्रद्धा मर्डर केसमध्ये ठोस पुरावे नाहीत?

shraddha-walker-murder-case-police-have-recovered-bones-and-a-bag-news-update-today
shraddha-walker-murder-case-police-have-recovered-bones-and-a-bag-news-update-today

नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha walker Murder  Case) प्रकरणाचा सुगावा अजूनही लागलेला नाही. या प्रकरणाचे धागेदोरे मिळावेत म्हणून दिल्ली पोलीस वसईलाही आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 5 राज्य, दोन जंगलात जाऊन पाहणी केली. 13 हाडे जप्त केली. पण श्रद्धा हत्याकांडप्रकरणी अजूनही पोलिसांकडे ठोस पुरावे नाहीत. त्यामुळे पोलिसांची मोठी डोकेदुखी वाढली आहे.

श्रद्धा हत्याकांडाची माहिती उजेडात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपी आफताबने कबुली जवाबही दिला आहे. परंतु, पोलिसांना अजूनही पुरावे सापडले नाहीत. आरोपीच्या कबुलीजबाबाशिवाय पोलिसांकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत.

श्रद्धा हत्याकांड प्रकरणात पोलिसांना अजूनही काही प्रश्न भेडसावत आहेत. या प्रश्नांचा गुंता अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

पोलिसांसमोरील हे प्रश्न अनुत्तरीत…

मृतदेहाचे किती तुकडे करण्यात आले?

मृतदेहाचे तुकडे कशाने केले? सुरा किंवा करवत कुठे आहे?

हत्येच्यावेळी श्रद्धाने कोणते कपडे परिधान केले होते? या कपड्यांचं काय झालं?

घरात मृतदेहाचे तुकडे आहेत का? रक्ताचे डाग आहेत का?

बाथरूम आणि नालीतून काही पुरावे मिळतील का?

श्रद्धाचा मोबाईल फोन कुठे आहे?

18 मे ते 5 जूनपर्यंत रात्री 2 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजल्यापर्यंत आफताबच्या मोबाईलचं लोकेशन

दिल्ली पोलिसांना या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. ही उत्तरे मिळाली तर आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होऊ शकते. या प्रश्नांची उत्तरे नाही मिळाली तर पोलिसांसमोर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.

पोलिसांनी चार दिवस महरौलीच्या जंगलात तपास केला. तब्बल 14 तास पोलिसांनी या जंगलात जाऊन पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. हे जंगल 35 किलोमीटरपर्यंत फैलावलेलं आहे. परंतु पोलिसांना जंगलात खूप आत जावं लागलं नाही. कारण आफताब ज्या ठिकाणाची माहिती देत होता, ते ठिकाण जंगलाच्या सुरुवातीलाच होतं. या ठिकाणांचा पोलिसांनी कसून तपास केला. पण त्यांच्या हाती फक्त 13 हाडं लागली.

पोलिसांना मिळालेली ही हाडं श्रद्धाची आहेत की एखाद्या प्राण्याची हे अजून स्पष्ट झाले नाही. फॉरेन्सिक रिपोर्ट नंतरच पोलिसांना त्याबाबतची माहिती मिळणार आहे.

श्रद्धाच्या हत्येचे पुरावे मिळावेत म्हणून पोलिसांनी आफताबच्या घराची अनेक वेळा कसून पाहणी केली. ज्या बाथरूममध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. तिथे काहीच सापडलं नाही. मात्र, किचनमध्ये काही ठिकाणी रक्ताचे डाग सापडले आहेत. गॅस सिलिंडर ठेवण्याच्या जागेत रक्ताचे डाग सापडले आहेत. या रक्ताचा खुलासाही प्रयोगशाळेतून होणार आहे.

पोलिसांना अजूनपर्यंत श्रद्धाचा मोबाईल सापडला नाही. तिचे कपडेही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. तसेच मृतदेह कापण्यासाठीचा सुरा किंवा करवतही सापडलेली नाही. हे हत्याकांड सहा महिन्यानंतर उजेडात आलं आहे. त्यामुळे सध्या तरी परिस्थितीजन्य पुराव्यांवरच हे प्रकरण तग धरून आहे.

आफताबच्या कबुलीनंतर पोलिसांनी छतरपूरच्या नाल्यांची पाहणी केली. या नाल्यात त्यांना काही हाडे आढळून आली आहेत. ही हाडं श्रद्धाची निघाल्यास पोलिसांच्या हाती मोठा पुरावा लागणार आहे. या शिवाय पोलिसांनी आफताबच्या घराजवळील काही कचऱ्याच्या गाड्यांचा शोध घेतला आहे.

मृतदेहाचे तुकडे करण्यापूर्वी कपडे काढण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी हे कपडे कचऱ्याच्या गाडीत टाकले होते, असं त्याने पोलिसांना सांगितलं होतं. आता पोलीस या कपड्यांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here