औरंगाबाद: महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवण्याची मालिका सुरु असताना त्यात एक नवीन भर पडली आहे. सिध्दार्थ उदयान प्राणिसंग्रहालयातील रंजना, प्रतिभा या वाघिणी आज रविवार (१९ फेब्रुवारी) अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले. विशेष म्हणजे याला काही राजकीय मंडळींनी विरोध केला होता. तरी सुध्दा महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.Ranjana pratibha tigresses will go to kamla Nehru park gujarat
रंजना व प्रतिभा या दोन वाघिणींचे वय २ वर्ष २ महिने आहे. सिद्धार्थ-समृद्धी या वाघाच्या जोडीचे हे अपत्य आहेत. महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून दहा सायाळ, दोन इमू, तीन कोल्हे व सहा स्पुनबील पक्षी दाखल झाले होते. सर्वांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना दोन दिवस वेगळ्या पिंज-यात ठेवण्यात आले होते. या प्राण्यांच्या बदल्यात दोन वाघिणी पाठविण्यात आले आहे.
देशभरातील प्राणिसंग्रहालयात प्राण्यांची देवाणघेवाण केली जाते. त्यानुसार महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील दोन वाघिणी मिळाव्यात, अशी मागणी अहमदाबाद येथील कमला नेहरू प्राणिसंग्रहालयातून आली होती. त्यास केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने पाठविण्यास मान्यता दिली होती. वाघिणींना पाठवताना सहायक अधिक्षक डॉ. डि. पी. सोळंकी, प्रभारी प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. शाहेद शेख, राकेशभाई पटेल,रंजितसिंग,सियारामभाई,समीर,मनोजभाई,दिनेशभाई लोहार या वेळी उपस्थित होते.
आता १० वाघ शिल्लक…
रंजना, प्रतिभा अहमदाबादला पाठविल्यानंतर १० वाघ शिल्लक आहेत. त्यात सात पिवळे तर तीन पांढरे वाघ आहेत. तीन नर व सात मादी आहेत. महापालिकेने आत्तापर्यंत देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयाला १७ वाघ दिले आहेत. १९९५ मध्ये ओरिसा येथील नंदन कानन प्राणिसंग्रहालयातून पांढऱ्या वाघांची (नर आणि मादी) जोडी महापालिकेने आणली होती. त्यानंतर २००५ मध्ये पंजाबच्या चतबीर प्राणिसंग्रहालयातून दोन वाघ आणि दोन वाघिणी आणण्यात आल्या. त्यातून २७ वाघांचा विस्तार महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयात झाला.