औरंगाबाद : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा समाज आंदोलकांवर पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेधार्थ सोमवारी औरंगाबाद जिल्हा बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाने दिली होती. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), मनसे, शिवसेना (उबाठा), शिंदे गट, एमआयएम, भारतीय कम्यूनिस्ट पक्षासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला होता. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, शाळा, रिक्षा बंद होत्या. तर ठिकठिकाणी विविध संघटनाच्या वतीने निदर्शने करण्यात आले. त्यामुळे दुपारपर्यंत जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
दरम्यान शहरात क्रांतीचौक, गुलमंडी, उस्मानपुरा, औरंगपुरा, निराला बाजार, सिटी चौक, रोशन गेट, कटकट गेट, पैठण गेट, मोंढा, जालना रोड, चिकलठाणा छावणी, टिव्ही सेंटर, गजानन महाराज चौक, जय भवानी नगर, दर्गा चौक, पुंडलीक नगर चौक, कामगार चौक, सिडको, हडको, मुकुंदवाडी, कॅनॉट प्लेस, टी पॉईंट, हडको कॉर्नर, आझाद चौकासह शहराच्या विविध भागात बंदला दुपारपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे गेल्या सात दिवसांपासून आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे. उपोषणस्थळी जाऊन पोलिसांनी लाठीहल्ला केल्यामुळे शेकडो उपोषणकर्ते गंभीर जखमी झाले होते. त्याचे पडसाद राज्यभर पसरले असून ठिकठिकाणी आंदोलन सुरु आहे. विविध राजकीय पक्षाचे नेते उपोषण कर्त्यांची भेट घेत असून उपोषणाला पाठिंबा देत आहे.
मराठा क्रांती मोर्च्याच्या या आहेत मागण्या आणि निर्णय…
पोलिसांच्या लाठीचार्जमुळे घटनेला जबाबदार उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा. आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे रद्द करावेत. महिलांवरील लाठीहल्ला करणा-या पोलिसांवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवावा. जालना पोलीस पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा. आरक्षणाचा प्रश्न सोडवा. हल्ल्याच्या निषेध. लाठीहल्ल्याचे आदेश देणा-या पोलीस अधीक्षकांना निलंबित करा. मराठा क्रांती मूक मोर्चा ऐवजी बोलका मोर्चा.
एसटीसेवा बंद…
औरंगाबाद विभागीय कार्यालयातून सर्वच एसटी बसेस सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. एसटीच्या उत्पन्नाला चांगला फटका बसला. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचे दिसून आले. बस स्थानकावर सकाळपासूनच शुकशुकाट होता. एसटी बंदचा आज तिसरा दिवस होता.
तगडा पोलीस बंदोबस्त..
पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या नेतृत्वाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन पोलीस उपायुक्तांसह पाच सहायक पोलीस आयुक्त तसेच २५ पोलीस निरीक्षक, ९६ एपीआय, आणि पीएसआय, १३०० पोलीस अमलदार, या सह होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आले होते.
गजानन महाराज मंदिर चौक
शहरातील गजानन महाराज मंदिर चौकात मराठा आंदोलकांनी आजच्या बंदमध्ये सहभाग घेतला. सकाळी ११ वाजेच्या सुमारास आंदोलकांनी चौकात ठाण मांडले. तसेच एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काच.. नाही कुणाच्या बापाचं… गृहमंत्री हाय हाय.. तसेच पालकमंत्री, आमदार आदी विरोधात जोरदार घोषणा देत रास्ता रोको केला. यावेळी सकल मराठा समाज बांधवानी आंदोलकांमध्ये सहभाग घेतला याप्रसंगी रामदास गायके पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष काळे पाटील, अनिल गायकवाड, दीपक पवार, बाबासाहेब चव्हाण, अमोल जाधव, विशाल विराळे, केदारनाथ गंडे, अनिल गायके, संगीता जाधव यांच्यासह महिला कार्यकत्या मोठया संख्येने सहभाग होता.. तसेच एसीपी रणजित पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक जयश्री आडे, पोलिस कॉन्स्टेबल अतुल तुपे, अरुण लकडे, दीपक जाधव आदींनी कडक बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळली.
पुंडलिक नगर चौकात ठिय्या
सकल मराठा समाजच्या वतीने पुंडलिक नगर शिवाजी महाराज पुतळा ते गजानन महाराज मंदिर चौक दरम्यान मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली. तसेच सरकार विरोधात घोषणाबाजी करत मराठा आरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी पुंडलिक नगर चौकात ठिय्या मांडला. त्यामुळे पोलिसांनी वन साईड रस्ता बंद करत दुस-या रस्त्याने वाहतूक वळवली होती.
शहानुर मियाँ दर्गा
शहानुर मियाँ दर्गा चौकात आठवडी बाजारामध्ये विक्रेत्यांना तुरळक प्रमाणात दुकाने मांडली आहे. दर सोमवारी या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र, आज बंदमुळे आठवडी बाजारात मोजकेच विक्रेते दिसून आले. नागरिक बाहेर पडले नसल्याने बाजारात विक्रेते ग्राहकांची प्रतीक्षा करत होते. नेहमी धावपळ असलेल्या या बाजारात आज शांतता होती. तसेच डीमार्ट मध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असते. आज मात्र, डि मार्ट बंद असल्याने परिसरात शुकशुकाट दिसून आला.
जय भवानीनगर, विश्रांती नगरमध्ये कडकडीत बंद
सर्वाधिक वर्दळ असलेल्या जयभवानी नगर भागात आज कडकडित बंद पाळण्यात आला. यावेळी शिवसेना (उबाठा), मराठा क्रांतीमोर्चा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या सह विविध संघटनांनी सहभाग घेतचौकात निर्दर्शने केली. तसेच सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी निलेश ढव्हळे पाटील, संदीप शिंदे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. मधुकर खिल्लारे, घारे पाटील, शिवकन्या भोसले यांनी मनोगत मांडले. तसेच फेरी काढली. यावेळी बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत.
खाजगी ट्रॅव्हल्स बंद
दर्गा चौकातील खाजगी बस थांब्यावर बाहेरून येणाऱ्या तसेच बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाश्यांची वर्दळ असते. मात्र, आज सर्वच ट्रॅव्हल्स एजन्सीनी बंदला पाठिंबा दिला. आज एकही तिकीट बुक झालेले नसून केवळ नियमित प्रवाश्याकडून फोनवर चौकशी करण्यात येत आहे. तर प्रवाशांना बंदचा फटका बसला असल्याचे दिसून आले.