मुंबई : अठरा वर्षांखालील मुलांना आज (15 ऑक्टोबर) शुक्रवारपासून रेल्वेप्रवास (Mumbai local Train) करता येणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या मुलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकल प्रवासासाठी १८ वर्षांखालील मुला-मुलींना मासिक पासच घ्यावा लागणार
लोकल प्रवासासाठी १८ वर्षांखालील मुला-मुलींना मासिक पासच घ्यावा लागणार आहे. त्यांना तिकीट सुविधा नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले. मासिक पास घेण्यासाठी तिकीट खिडक्यांवर त्यांना पुरावा म्हणून ओळखपत्र दाखवावे लागेल. प्रवासावेळी पास आणि ओळखपत्रही सोबत बाळगावे लागेल, असे मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
शाळा, महाविद्यालयांत जाण्यासाठी त्यांच्यापुढे प्रवासाची होती मोठी अडचण
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांपाठोपाठ दोन लसमात्रा घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. मात्र, १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांना लोकल प्रवास करता येत नव्हता. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांत जाण्यासाठी त्यांच्यापुढे प्रवासाची मोठी अडचण होती.
अठरा वर्षांखालील मुलांना लसवंत म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. लोकल प्रवासासाठी आणखी कोणाला परवानगी आहे, यासंदर्भात राज्य सरकारने काही मुद्यांवर रेल्वेशी चर्चा करुन सूचना केल्या आहेत.
या मुलांना १५ ऑक्टोबरपासून परवानगी देत असल्याचे रेल्वेने सांगितले. एखाद्या व्यक्तीला काही महत्त्वाच्या वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करायचा असल्यास त्यांनाही लोकल प्रवास करता येईल. त्यासाठीही डॉक्टरांकडून प्रमाणपत्र पुरावा म्हणून घ्यावा लागेल आणि तो दाखवताच मासिक पास तिकीट खिडक्यांवर उपलब्ध होईल.यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.