मोठी बातमी: “…म्हणून मी माझ्या नावाचा एबी फॉर्म असतानाही सत्यजीत तांबेंचा अर्ज भरला”, सुधीर तांबेंनी सांगितलं कारण

satyajeet-tambe-suspended-from-congress-party-due-to-rebellion-from-nashik-graduate-constituency-news-update-today
satyajeet-tambe-suspended-from-congress-party-due-to-rebellion-from-nashik-graduate-constituency-news-update-today

नाशिक: नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. मात्र सुधीर तांबे यांच्या नावाने एबी फॉर्म आला असतानाही त्यांनी माघार घेत आपला अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजीत तांबे (satyajeet tambe) यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म आलेला असतानाही स्वतःची उमेदवारी मागे घेत मुलाचा अर्ज का दाखल केला? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर सुधीर तांबेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते गुरुवारी (१२ जानेवारी) नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सुधीर तांबे म्हणाले, “काँग्रेसकडून मी तीन वेळा नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो. पहिल्या वेळी मी अपक्ष उमेदवार होतो. पदवीधर मतदारसंघ विधान परिषदेचा एक वेगळा मतदारसंघ आहे. अशा मतदारसंघातून सत्यजीत तांबेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.”
“सत्यजीत तांबे राज्यात जे तरुण मुलं नेतृत्व करत आहेत त्यात एक दूरदृष्टी असलेलं युवानेतृत्व आहे. त्यांना वेगवेगळ्या विषयांचं सखोल ज्ञान आहे. त्यामुळे हे या निवडणुकीत हे नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं. त्यामुळे आम्ही सत्यजीत तांबे यांचा अर्ज भरला आहे. हा अर्ज महाविकासआघाडीच्या वतीने भरला आहे,” अशी माहिती सुधीर तांबेंनी दिली.

“फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे”
सुधीर तांबे पुढे म्हणाले, “आम्ही फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे. सत्यजीत तांबेंच्या नावाला काँग्रेसमधील काही पक्षश्रेष्ठींनी विरोध केला असं नाही. कोणी विरोध केला असेल असं मला वाटत नाही. कारण आमच्या पक्षाचंही हे धोरण आहे की, तरुण लोक राजकारणात आली पाहिजेत. काँग्रेसने तरुणांना संधी देण्याचं मोठं काम केलं.”

“…म्हणून माझ्या नावाचा एबी फॉर्म असतानाही सत्यजीत तांबेंचा अर्ज भरला”
“शेवटच्या क्षणापर्यंत विचार सुरू असतात. त्यामुळे माझ्या नावाची घोषणा झालेली असतानाही सत्यजीत तांबे यांचा अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबेंनी दोन अर्ज भरले आहेत. एबी फॉर्म माझ्या नावाने आला होता. त्यामुळे थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. परंतु या निवडणुकीत निवडणूक चिन्ह नसतं. त्यामुळे सत्यजीत या निवडणुकीत महाविकासआघाडीचे उमदेवार म्हणून उभे आहेत,” असं मत सुधीर तांबेंनी व्यक्त केलं.

“सर्वच पक्ष सत्यजीत तांबेंना मदत करतील”
“सत्यजीत तांबे हे एक चांगलं नेतृत्व आहे. इथं बऱ्याच गोष्टी अशा असतात की, पक्षाच्याही पलिकडे विचार करावा लागतो. सर्वच पक्ष तसा विचार करत असतात. सर्वच पक्ष सत्यजीत तांबेंना मदत करतील अशी आमची अपेक्षा आहे,” असंही सुधीर तांबेंनी नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here