मुंबई: भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit kamboj) यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि अभिनेत्री राखी सावंत या बहिणी असल्याचे म्हटले होते. सुषमा अंधारे आणि राखी सावंत या दोन्ही बहिणी आहेत. एक बहीण महाराष्ट्राच्या राजकारणात, तर दुसरी बहीण महाराष्ट्राच्या सिनेमात. दोन्ही बहिणी एकमेकींशी स्पर्धा करत आहेत, की रोज सगळ्यात जास्त सनसनाटी कोण निर्माण करेल, असा टोला मोहित कंबोज यांनी लगावला होता.
याला आता सुषमा अंधारेंनी सभेत बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. “बाईपणावर हल्ला करणे हा षड्यंत्र आणि कटाचा भाग आहे. त्याला मी भीक घालणार नाही. बाईपणाचे कोणतेही विक्टीम कार्ड खेळणार नाही. मी लढेन आणि जिंकेलही,” असे सुषमा अंधारेंनी सांगितलं.
“कंबोजची प्रवृत्ती चांगली नाही. त्याची प्रवृत्ती चांगली असती, तर राखी सावंतची तुलना अजून कोणशीतरी केली असती. पण, राखी सावंतची तुलना फक्त अमृता फडणवीस यांच्याबरोबर होईल. कारण, राखी सावंतच्या चेहऱ्याची सर्जरी झाली, अमृता वहिनींच्या सुद्धा चेहऱ्याची सर्जरी झाली… राखी सावंत गायक आहे… अमृता वहिनी सुद्धा गायक आहेत. राखी सावंत मॉडेल आहे… अमृता वहिनी सुद्धा मॉडेल आहेत,” असं टोमणा सुषमा अंधारेंनी लगावला आहे.
“राखी सावंतचे क्षेत्र भलेही कोणतेही असो, तिच्याबद्दल बोलताना तुमची जीभ सैल सुटते, याचा अर्थ गृहमंत्र्यांचा पोलिसांवर वचक नाही. पोलिसांना वचक नावाची गोष्ट कळत नाही. त्यांना फक्त हफ्ते नावाची गोष्ट कळते,” अशी टीकाही सुषमा अंधारेंनी केली आहे.