सोलापूर : दोन दिवसांपूर्वी सोलापुरात संघ परिवाराने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आयोजिलेल्या हिंदू गर्जना मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते, माजी महापौर महेश कोठे यांचा सहभाग सार्वत्रिक चर्चेचा विषय ठरला असतानाच, याच मोर्चात सहभागी झालेले त्यांचे पुत्र, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हे तलवार बाळगून हवेत फिरविल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत.
फौजदार चावडी पोलीस ठाण्यात प्रथमेश कोठे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक विनोद व्हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रथमेश कोठे हे हिंदू गर्जना मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चा माणिक चौकात पोहोचला असता प्रथमेश कोठे यांनी मोर्चात लाल वेष्टनात गुंडाळून आणलेली तलवार हातात बाळगली आणि मोर्चेकऱ्यांच्या गर्दीमध्ये तलवार हवेत फिरविली. यात पोलीस प्रशासनाने दिलेल्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन झाले.