T20 WC AUS vs NZ Final : न्यूझीलंडला धूळ चारत ऑस्ट्रेलिया प्रथमच बनला टी-२० विश्वविजेता

t20-wc-aus-vs-nz-fwinal-australia-lift-maiden-t20-world-cup-beat-new-zealand-by-8-wickets-news-update
t20-wc-aus-vs-nz-fwinal-australia-lift-maiden-t20-world-cup-beat-new-zealand-by-8-wickets-news-update

दुबई: न्यूझीलंडला धूळ चारत टी-२० विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच आपले नाव कोरले आहे. रविवारी दुबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने, न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने दिलेले १७३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने १९ व्या षटकात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्श आणि मॅक्सवेल या जोडीने धडाकेबाज फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना फिंच स्वस्तात माघारी फिरला. पण त्यानंतर डेविड वॉर्नरची फटकेबाजी आणि मिशेल मार्शनं केलेली अर्धशतकी (७७) खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने पहिला टी-२० विश्वचषक उंचावला. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियन संघाला इंग्लंडने फायनलमध्ये पराभूत केले होते. त्यानंतर अखेर जेतेपद मिळवण्यात त्यांना यश आले.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. मार्टिन गप्टिल आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडसाठी सलामी दिली. सेमीफायनलचा नायक ठरलेला मिशेल या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. चौथ्या षटकात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने मिशेलला (११) यष्टीपाठी झेलबाद केले. मिशेलनंतर कप्तान केन विल्यमसन मैदानात आला. मिचेल मार्शने टाकलेल्या नवव्या षटकात न्यूझीलंडने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर विल्यमसनने गप्टिलसह धावा जमवल्या. झम्पाने १२व्या षटकात गोलंदाजीला येत संथ खेळणार्‍या गुप्टिलला तंबूत पाठवले.

गप्टिलने २८ धावा केल्या. त्याच्यानंतर ग्लेन फिलिप्ससह विल्यमसन स्थिरावला. पुढच्या षटकात त्याने आक्रमक पवित्रा धारण करत मॅक्सवेलला दोन षटकार खेचले. याच षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. स्टार्कने १६वे षटक टाकले. या षटकात विल्यमसनने आक्रमक फटकेबाजी करत २२ धावा लुटल्या. १६ षटकात न्यूझीलंडने २ बाद १३६ धावा केल्या.

फटकेबाजीमुळे विल्यमसन-फिलिप्स यांच्यात अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली. हेझलवूडने १८व्या षटकात फिलिप्स (१८) आणि विल्यमसनला (८५) माघारी धाडले. विल्यमसनने आपल्या खेळीत १० चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हात खोलू दिले नाहीत. २० षटकात न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या. नीशम १३ तर सेफर्ट ८ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियासाठी हेझलवूडने १६ धावांत ३ बळी घेतले. विजयासाठी १७३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने लिलया पेलले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here