बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा येथील शिक्षकाचे एक संतापजनक कृत्य समोर आले. अकरावीचे ॲडमिशन घ्यायला मदत केल्यावर मोबाइल क्रमांक मिळवून कॉलेजच्या एका शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण करीत तिच्यावर अत्याचार केला. १९ ऑगस्ट २०२५ रोजी जवाहरनगर, बीड बायपास भागात ही घटना घडली. दरम्यान सहा महिन्यांपासून तो आरोपी शिक्षक तिला फोन करून त्रास देत होता. याप्रकरणी १ नोव्हेंबरला जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
महेश विजय मखमले (रा. मलकापूर पांग्रा, जि. बुलढाणा) आणि त्याला मदत करणारा सिद्धेश्वर जायभाये, अशी आरोपींची नावे आहेत. महेश हा मुख्य आरोपी असून जायभाये याने त्याला मदत केली. १६ वर्षे ११ महिन्यांच्या पीडितेने तक्रार दिली. २०२४ मध्ये तिने अकरावीला प्रवेश घेतला. त्यांनतर नीटच्या तयारीसाठी ती छत्रपती संभाजीनगरात आली. दरम्यान, प्रवेश घेण्यासाठी मदत करताना आरोपी महेश मखमले याने पीडितेच्या आईचा मोबाइल क्रमांक घेतला होता. तोच मोबाइल सध्या पीडिता वापरत आहे. या मोबाइलवर फोन करून आरोपी महेश मखमले हा पीडितेला तू मला भेटायला ये, मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्यासोबत लग्न करीन, पत्नी, लेकरांना सोडून देईल, असे म्हणत त्रास देता होता. त्यामुळे पीडितेने काही दिवस मोबाइल बंद केला होता. एप्रिल २०२५ मध्ये पीडिता पेपर देण्यासाठी कॉलेजला गेली असता आरोपीने तिला कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात नेले. तेथे बसलेल्या एका मॅडमला बाहेर पाठवून त्याने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे एक शिक्षक आल्यावर पीडिता बाहेर पडली होती. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मारोती खिल्लारे करीत आहेत.
बोलेरो कारमधून अपहरण
१९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पीडिता तिच्या मैत्रिणीला भेटायला जात असताना आरोपी बोलेरो कारमधून आला. त्याने रस्त्यावरच हात धरून पीडितेला कारमध्ये ओढले. तेव्हा एकजण तोंड बांधून कार चालवित होता. त्या कारमध्ये आरोपी महेश मखमले याने पीडितेला गुंगीकारक औषध दिले. त्यानंतर दर्गा चौक, बीड बायपासमार्गे नेत अत्याचार केला. रात्री साडेआठ वाजता तिला हॉस्टेलवर सोडले.
पीडितेच्या मैत्रिणीने आईला सांगितली घटना
या प्रकरणानंतर पीडिता प्रचंड घाबरली. ती सतत रडत बसायची. तिच्या मैत्रिणीने विचारपूस केल्यावर हा प्रकार त्यांना सांगितला. त्यांनी फोन करून पीडितेच्या आईला सविस्तर घटनाक्रम कळविला. त्यानंतर पीडितेची आई, मामा यांनी येऊन १ नोव्हेबर रोजी जवाहरनगर पोलीस ठाण्यात बलात्कार, अपहरण आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.




















































































































































































