सोलापूरवरून मी लातूरला पोहचलो. पत्रकार बालाजी फड, रामेश्वर धुमाळ, असे अनेक पत्रकार मित्र माझी शासकीय विश्रामगृहात वाट पाहत होते. विश्रामगृहातला स्वागत-सत्कार, भेटीचा कार्यक्रम संपला. ‘सकाळ’च्या ऑफिसमध्ये विकास गाढवे, दतात्रय माळी ही सगळी मंडळी वाट पाहत बसली होती. त्यांच्या भेटी-गाठी घेऊन मी अन्य लोकांच्या भेटीसाठी लातूरमध्ये फेरफटका मारत होतो. जयकाची बिर्याणी, खव्याची जिलेबी, लातूरमधले हे सारे काही आवडीचे खाणे आता संपले होते. आंबेजोगाई रोडला सोमवंशी नगर या भागातून मी जात होतो. समोर असणाऱ्या इमारतीच्या समोर जे काही घडत होते ते अजब होते. तोंडाला फेस आलेली माणसे, डोळ्यांत अश्रू आलेल्या महिला आणि आनंदी चेहरा घेऊन काहीतरी सांगायला आलेल्या महिला, असे तीन प्रकारचे चित्र तिथे होते. मी तिथल्या माहिती फलकावर नजर टाकली आणि मला साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. व्यसन सोडून घरी पूर्णतः बरे होणाऱ्यांचा आकडा पाहून मी एकदम चक्रावून गेलो. मी मोठ्या शहरापासून ते गावाकुसात सर्व ठिकाणी फिरतो. तिथल्या व्यसनात बुडालेल्या त्या प्रत्येक माणसाला इथे आणावे असे मला वाटत होते. ‘जीवनरेखा प्रतिष्ठान’ संचालित ‘जीवनरेखा व्यसनमुक्ती उपचार केंद्र’ १९९९ मध्ये येथे सुरू झाले होते. व्यसनात बुडालेल्यांकडून येथे एकही रुपया न घेता मोफत इलाज करणाऱ्या ‘जीवनरेखा प्रतिष्ठान’च्या या व्यसनमुक्ती केंद्राने आजपर्यंत वीस हजारांपेक्षा जास्त लोकांना गंभीर व्यसनातून मुक्त केले होते. मी ते सारे वाचून, अनुभवून, डेटा पाहून, तिथले वातावरण पाहून चक्रावून गेलो.
एक भलामोठा हार घेऊन मोठे कुंकू लावलेली महिला तिच्या यजमानांसोबत कुणाची तरी वाट पाहत होती. थोड्या वेळात एक तरुण गाडीतून खाली उतरला आणि त्या महिलेने तो हार त्या तरुणाच्या गळ्यात टाकला. तो तरुणही प्रचंड संस्कारी दिसत होता, त्यांनी वाकून त्या महिलेचे दर्शन घेतले. त्या तरुणाला भेटायला आलेले अनेक जण हार-तुरे देत त्याचे स्वागत करत होते. मी अनोळखी माणसासारखे त्यांच्यामध्ये शिरलो. आतमध्ये गेलो. बाहेरून वाटणारी ती बंदीशाळा आतमध्ये असणाऱ्या व्यवस्था पाहून एखाद्या सुंदर आखीव-रेखीव घरासारखी वाटत होती. त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये येणारा प्रत्येक जण, त्याच्या मागे लागलेली व्यसनाची साडेसाती सोडवण्यासाठी तिथे प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. तो तरुण तिथे असणाऱ्या प्रत्येकाशी आस्थेवाईकपणे बोलत होता, जेवण झाले का, काही अडचण आहे का, औषधे घेतलीत का, असे विचारत होता.
केवळ ती एक महिलाच नव्हे तर अनेक जण त्या तरुणाचे आभार मानत होते. मी त्या महिलेकडे गेलो, तिला बोलते केले. त्या महिलेचे नाव गयाबाई शिंदे होते. त्या तुळजापूरच्या होत्या. त्या मला सांगत होत्या, ‘‘माझ्या यजमानाने सारी संपत्ती दारू, जुगारावर लावली. साठ एकर जमिनीमधील सहा एकर जमिनीचा तुकडा, तोही सावकाराकडे गहाण असल्यामुळे शिल्लक राहिला. जमीन गेली, आयुष्य वादावादीमध्ये, भांडण-तंट्यात गेले. माझ्या यजमानांना अनेक आजारांनी ग्रासले. लातूरला दारू सुटते अशी माहिती मिळाल्यावर मी ‘जीवनरेखा व्यसनमुक्ती उपचार केंद्रात’ यांना घेऊन आले.’’ माझे यजमान संतोष शिंदे यांचे केवळ अठ्ठावीस दिवसांमध्ये दारूचे व्यसन सुटले. योगा, व्यायाम करणे, गाणे म्हणणे, वाचन करणे अशा अनेक कला त्या २८ दिवसांमध्ये संतोष यांनी शिकल्या होत्या. संतोष दारू पीत होते त्या काळात तिन्ही लेकरांचे आयुष्य बरबाद कसे झाले, यासह अनेक वाईट प्रसंग जेव्हा गयाबाई सांगत होत्या, तेव्हा माझ्या अंगावर काटा येत होता.
संतोष यांनी सेंटरमधून घरी गेल्यावर दोन महिने उलटून गेल्यानंतरही दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नव्हता, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांना खात्री पटली, आता संतोष दारूमुक्त झाले आहेत. या केंद्रात होणारा आयुर्वेदिक औषधांचा मारा, समुपदेशनच्या माध्यमातून निघून जाणारी डोक्यातली घाण हे नियमितपणे येथे घडत गेले. अंगावर ठिगळाचे लुगडे असलेल्या अनेक गयाबाई आपल्या आयुष्याची दारूमुळे झालेली कैफियत मी विचारल्यामुळे मला सांगत होत्या. हे सेंटर म्हणजे आमचे ‘कुंकू वाचवलेले देवालय’ आहे, आमचे माहेर आहे, असे त्या महिला म्हणत होत्या. मी त्या व्यसनमुक्ती केंद्रात अनेकांशी बोललो, अनेकांच्या धक्कादायक कथा होत्या. बीड जिल्ह्यातील सर्जेराव भोसले ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उभे होते. प्रचाराच्या काळात रोज रात्री दारूच्या पार्ट्या व्हायच्या. त्या पार्ट्यांमध्ये मित्रांसोबत कंपनी देण्याच्या नावाखाली भोसले यांना दारूचे व्यसन लागले. निवडणूक संपली. सर्जेराव निवडून आले. निवडून आल्यावर ते ग्रामपंचायतीचे सदस्य आणि पट्टीचे दारू पिणारे दारुडे असे दोन्ही झाले. दिवसेंदिवस त्यांचे दारूचे व्यसन वाढले. काही नातेवाईकांच्या सांगण्यावरून ते गेल्या पंधरा दिवसांपासून या केंद्रात उपचार घेतात. न घाबरता, न लाजता सर्जेराव माझ्याशी मनमोकळेपणाने बोलत होते. दारूचे व्यसन लावून मी माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड मोठी चूक केली. समाजातली होती नव्हती ती सर्व ‘पत’ निघून गेली. कोणाचा विश्वास राहिला नाही. एखाद्या कुत्र्याचे जगणे व्हावे तसे माझे जगणे झाले होते. हे कुत्र्यासारखे जगणे थांबले पाहिजे म्हणून मी इथे आलो. आता पंधरा दिवस झालेत, मी पूर्ण बरा झालो आहे. आता माझी दारू पूर्णपणे सुटली. येथे औषधपाणी, राहणे, खाणे, समुपदेशन सर्व काही मोफत दिले जात आहे. सर्जेराव अगदी हृदयापासून मला सांगत होते. सर्जेराव यांच्यासारख्या कहाण्या अनेकांच्या होत्या.
मी सर्वात शेवटी त्या युवकाला भेटलो. आणि मला समजले की, औषध आणि बाकी सर्व ठीक, पण ही प्रचंड व्यसनात बुडालेली माणसे या उच्च शिक्षित तरुणाच्या वाणीतून निघालेल्या प्रत्येक शब्दामुळे व्यसन सोडत आहेत. तिथे येणारे दारूच्या नशेत हलत-डुलत येणारे होते आणि तिथून बरे होऊन जाणारे पांढरेशुभ्र कपडे, डोक्यावर टोपी घालून शांतपणे बाहेर पडत होते. त्या बाहेर पडणाऱ्या प्रत्येक पावलामध्ये आता कुठलेही दारूचे व्यसनच काय कुठलाही ‘कुविचार’ येऊ शकत नाही, असा आत्मविश्वासाचा एक जादुई आविष्कार आहे, असे वाटत होते.
मी त्या तरुणाला भेटलो, त्याच्याकडून त्या केंद्राचे सर्व काम समजून घेतले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तिथे येणारी माणसे प्रचंड दुःख आपल्या वाट्याला आहे, असे सांगून केंद्रामध्ये प्रवेश करतात. २८ दिवसांनंतर ही मंडळी सगळे दुःख इथेच ठेवून नव्याने आयुष्य सुरू करतात.
मी ज्या युवकाशी बोलत होतो त्याचे नाव कृष्णा यादव. (9890759512) कृष्णा उच्चशिक्षित आहे. पुण्यामध्ये कृष्णाने एमबीए केले. देशात आणि परदेशात कृष्णाला नोकरीसाठी ‘ऑफर’ आल्या, त्यातील एकही ‘ऑफर’ कृष्णाने स्वीकारली नाही. कृष्णाने ठरवले होते, आजोबा आणि वडिलांचा सामाजिक वारसा पुढे चालवायचा आहे. सेवाभावी वारसा पुढे चालवण्यात जो आनंद आहे, तो आनंद परदेशात जाऊन नोकरी करण्यात नाही, असे कृष्णाला वाटते. कृष्णाचे वडील आणि आजोबा दोन्हीजण प्रचंड दानसूर व्यक्तिमत्व आहेत, असेही कृष्णा सांगत होते.
कृष्णा मला म्हणाला, नोकरी करण्यासंदर्भातल्या चांगल्या ऑफरकडे पाहताना मला माझ्या वडिलांचा आणि माझ्या आजोबांचा चेहरा आठवत होता. माझ्यावर घालून दिलेले संस्कार मला दिसत होते. आपण लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचे, त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे, हे मी सातत्याने माझ्या वडिलांकडून शिकलो होतो. आमच्या गप्पा खूप वेळ चालल्या. लोक अपयशाचे खापर दारूवर कसे फोडतात याचे अनेक किस्से मी ऐकले. तिथे उपचार घेणारे तरुणच जास्त होते. जेवढे लोक तिथल्या रुग्णांना भेटायला येत होते, तेवढेच लोक कृष्णाचे आभार व्यक्त करण्यासाठी येत होते. अलीकडे व्यसनमुक्ती केंद्र एवढे का वाढलेत, त्याचे कारण संस्कार कमी होत आहेत, असेच म्हणावे लागेल.
मी त्या व्यसनमुक्ती केंद्रामधल्या अनेकांच्या भेटी घेतल्या. शेवटी कृष्णाचा निरोप घेऊन मी निघालो. तरुण व्यसनाधीन होत आहेत, तरुण आपल्या आई-वडिलांचे ऐकत नाहीत, असा अलीकडे सूर अनेक ठिकाणी ऐकायला मिळतो. कदाचित संगत, संस्कारहिनता अशी अनेक कारणे त्याला असतील. लोकांच्या आयुष्यात व्यसनामुळे झालेले महाभारत थांबवायचे असेल म्हणूनच कदाचित लातूरमध्ये कृष्णा यादवचा जन्म झाला असेल. कृष्णासारखे अनेक तरुण पुढे आले आणि त्यांनी आपल्या वडिलांच्या संस्कारांचा वारसा पुढे चालवला तर समाजातील वाईट वृत्तींचा नायनाट नक्कीच होईल. वाढणारी व्यसनाधीनता पाहून तुम्हा-आम्हाला सर्वाला कृष्णा बनावे लागेल.
लेखक संदीप काळे (पत्रकार)
9890098868