ईडीच्या नोटिशीनंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’चा ‘बंद रे व्हिडीओ’ का झाला?”;सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना खोचक सवाल

shivsena-leader-sushma-andhare-criticize-mns-chief-raj-thackeray-in-mulund-speech-news-update-today
thackeray-group-shivsena-leader-sushma-andhare-criticized-mns-chief-raj-thackeray-on-agitations-and-ed-news-update-today

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची रविवारी मुंबईत सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी राज्यातील विविध मुद्द्यांवर चौफेर टीका केली. या टीकेचा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी समाचार घेतला आहे. “एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही”, असं विधान राज ठाकरेंनी केलं. या विधानावर अंधारेंनी तुफान टोलेबाजी केली. “राज भाऊंचा तो स्वभाव नाही, असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा चांगलं वाटतं. पण शब्द सत्यात सुद्धा उतरले पाहिजेत. ईडीच्या नोटिशीनंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’चा ‘बंद रे व्हिडीओ’ का झाला?”, असा मिश्किल सवाल अंधारेंनी ‘टीव्ही ९’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.

इतर राज्यांचाही विकास झाला पाहिजे, या राज ठाकरेंच्या विधानावरुनही अंधारेंनी टीकास्र डागलं. “तुमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरुन ‘संघराज्य सेना’ करा”, असा खोचक सल्ला त्यांनी दिला.

 ईडीच्या नोटिशीची भीती कुणाला वाटली?

“मराठीचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राचं नवनिर्माण करू पाहात आहे असं तुम्ही सांगता. पण नेमकं तुम्ही काय निर्माण करू पाहात आहात. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांबद्दल आपण काहीच बोलू इच्छित नाही. त्यांच्या पायउतार होण्याबाबत तुम्ही ठामपणे वक्तव्य करू शकत नाही. ज्या देवेंद्र फडणवीसांनी मनसे म्हणजे ‘मतदार नसलेली सेना’ म्हणत अवहेलना केली, त्यांना तुम्ही ठामपणे उत्तरं देऊ शकत नाही. तुम्ही जोर दाखवता तो कुटुंबातच…भावकीत भांडणं करण्याचीच तुम्ही शिरशिरी दाखवता. यावरुन कळतं पैसे कुणी घेतले किंवा ईडीच्या नोटिशीची भीती कुणाला वाटली आहे”, अशी टीका अंधारेंनी केली आहे. आम्हाला ईडीची भिती वाटली असती, तर आम्ही बिळात बसलो असतो. पण आम्ही ठामपणे लढत आहोत, असंही अंधारे यावेळी म्हणाल्या.

 “सुपारीबाज आंदोलनं बंद करा”

“शिळ्या कढीला ऊत आणणे म्हणजे काय? हे राज ठाकरेंकडून शिकण्याची गरज आहे. भोंगे उतरवण्याबाबत त्यांनी बोलत राहावं, पण भोंगे उतरल्यानं महाराष्ट्राचं कोणतं नवनिर्माण होणार आहे? यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले प्रकल्प परत येणार आहेत का? बेरोजगारांना रोजगार मिळणार आहेत का? गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तारांसारखे नेते बेलगाम बोलल्याने निर्माण झालेल्या महिला सुरक्षेच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे का? याची उत्तरं होकारार्थी असल्यास आम्ही सुद्धा तुमच्या सोबत भोंगे उतरवायला तयार राहू”, असं अधारे म्हणाल्या. सुपारीबाज आंदोलन बंद केली पाहिजेत, असा खोचक सल्लाही त्यांनी राज ठाकरेंना दिला.

चांगल्या रस्त्यांसाठी आंदोलन करा

“जो माणूस २५ लाखांची गाडी वापरू शकतो तो ५० रुपयांचा टोल भरू शकतो. टोल आंदोलन करण्यापेक्षा चांगल्या रस्त्यांसाठी आंदोलन करा. वडा पावची गाडी हटवायची किंवा टॅक्सी आंदोलन करण्यापेक्षा गुजराती बिल्डरांनी जे अतिक्रमण केलं आहे. यावर कधीतरी बोला”, असं आवाहन अंधारेंनी केलं आहे. “राज ठाकरेंचं कालचं भाषण म्हणजे बोलाचाच भात, बोलाचीच कढी म्हणजे काय मनसे…”, असा टोला अंधारेंनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here