मुंबई : कर्नाटकात काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या ५ गॅरंटींची यशस्वीपणे अंमलबजाणी सुरु असून कर्नाटकातील लाखो लोक या गॅरंटींचा लाभ घेत आहेत. सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत ५ गॅरंटी लागू करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरु आहे. या ५ गॅरंटीसाठी कर्नाटक सरकारने अर्थसंकल्पातच ५६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याने निधीची कमतरता असण्याचे काहीच कारण नाही असे स्पष्ट करत पंतप्रधान मोदी व भाजपा नेते काँग्रेसच्या ५ गॅरंटीबद्दल अपप्रचार करत आहेत. या गॅरंटींच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी त्यांनी कर्नाटकात यावे त्यांचे स्वागत आहे, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा Dr G. Parmeshwara म्हणाले.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने सुरु केलेल्या ५ गॅरंटींची माहिती टिळक भवनमधील पत्रकार परिषदेत देताना जी. परमेश्वरा पुढे म्हणाले की, गृहलक्ष्मी गॅरंटी अंतर्गत राज्यातील सर्व महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना २ हजार रुपये जमा केले जात आहेत. या योजनेचा आतापर्यत १.२२ कोटी लाभार्थींनी लाभ घेतला असून ३०,४१६ कोटी रुपये त्यांच्या खात्यात दिले आहेत. गृहज्योती योजनेचे १.६६ कोटी लाभार्थी असून त्यावर १४,०६५ कोटींच्या निधीचे वाटप केले आहे. युवानिधी गॅरंटीखाली बेरोजगार तरुणांना महिन्याला ३ हजार रुपये दिले जात आहेत. या योजनेचे ४.३० लाख लाभार्थी आहेत व २०० कोटींचे वाटप केले आहे. शक्ती गॅरंटीअतंर्गत प्रत्येक महिलेला कर्नाटक सरकारच्या बस मधून मोफत प्रवासाची सुविधा सुरु आहे. शक्ती गॅरंटीअंतर्गत ३१७ कोटी महिलांनी प्रवास केला असून ६१२५ कोटी रुपये आतापर्यत खर्च करण्यात आले आहेत तर अन्नभाग्य गॅरंटीअंतर्गत १० किलो धान्य मोफत दिले जात आहे. या गॅरंटीचा १.१५ कोटी लाभार्थींनी लाभ घेतला असून ८२२९ कोटींचे वाटप केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे नेते जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी अपप्रचार करत आहेत. या ५ गॅरंटी सरकारचा कालावधी पूर्ण होईपर्यंत सुरुच राहतील अशी ग्वाही जी. परमेश्वरा यांनी दिली.
महाराष्ट्रातील भाजपा शिंदे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून जलयुक्त शिवार योजनेत १० हजार कोटींचा घोटाळा, रुग्णवाहिका खरेदीत ८ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात ड्रग्जची खुलेआम विक्री होत असून तरुणपिढी नशेच्या आहारी जात आहे. महाराष्ट्रातील भाजपा सरकार हे सावकारांचे सरकार आहे. महाराष्ट्रातील वातावरण हे महाविकास आघाडीसाठी अनुकुल असून मविआ सरकार स्थापन करेल, असा विश्वासही जी परमेश्वरा यांनी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला माजी मंत्री सुरेश शेट्टी, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे मीडिया प्रभारी सुरेंद्र राजपूत, प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी उपस्थित होते.