छत्रपती संभाजीनगरःमुंबईत बांगलादेशी घुसल्याचा आरोप भाजपकडून केला जातो, मात्र बांगलादेशी घुसल्याचे हे तुमचेच अपयश आहे, केंद्रिय गृहमंत्री अमित शहांचे अपयश आहे, त्यांनी सीमा सुरक्षित ठेवल्या नाहीत, असे म्हणत शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी भाजपवर हल्लाबोल केला. राष्ट्रप्रथम असे म्हणणारी भाजप आता राहिली नाही. भ्रष्टाचार प्रथम, गुंड प्रथम असे म्हणणारी आजची भाजप असल्याची टिका ठाकरेंनी केली. छत्रपती संभाजीनगरातील मराठावाडा सांस्कृतिक मंडळावर शनिवारी (दि.१०) आयोजित शिवगर्जना सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले की, शहराचे नाव आम्ही बदलले, भाजपने याचे श्रेय घेवू नये. त्यांनी अहमदाबादचे नाव कर्नावती करून दाखवावे, अमित शहांचा हा मतदारसंघ आहे, आधी त्याचे नामांतर करून दाखवा, असे म्हणत भाजपला आव्हान दिले. शिवसेनाप्रमुखांना यांना आपल्या ताटातील खायला दिले नसते, तर राजकारणात यांचा कुपोषणााने मृत्यू झाला असता, असा टोलाही त्यांनी रावसाहेब दानवेंना लगावला. आजच्या सभेला झालेली गर्दी पाहून मला शिवसेना प्रमुखांच्या १९८८ च्या सभेची आठवण झाली. चला आपण पुन्हा नवीन सुरुवात करूयात. या शहरात ३६५ दिवसांपैकी फक्त ४४ दिवस पाणी मिळते, असे असूनही शहरातील नागरिकांना चीड का येत नाही. गद्दारांनी आपले सरकार पाडले नसते, तर मी तुम्हांला पाणी दिले असते. मी मुख्यमंत्री असताना विकासकामांचे नियोजन केले. यातील अनेक कामांचे श्रेय आता भाजपवाले घेत आहेत. बदलापूरमधील चिमुकली अत्याचार प्रकरणातील सहआरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक केले. पालघरमधील साधूंच्या हत्याकांडातील आरोपीला पक्षात प्रवेश दिला, हे यांचे हिंदुत्व आहे. यावेळी ठाकरेंनी पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे यांच्यावरही शाब्दीक हल्ले चढविले. या छत्रपती संभाजीनगरवर भगवा फडकविण्याचे वचन मला द्या, मी तुम्हांला विकासकामे पूर्ण करण्याचे वचन देतो, तुम्ही माझे एक वचन पूर्ण करा, मी बाकीची वचने पूर्ण करतो, मतांसाठी पैसे घेऊन आपले व आपल्या मुलांचे आयुष्य उदध्वस्त करू नका, असे भावनिक आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
विजयी सभेला राजला सोबत आणेन..
राज ठाकरे यांची ठाण्यात बैठक असल्याने, ते आजच्या सभेला येऊ शकले नाही, असे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाषणात सांगितले.तर निकालानंतर आठ दिवसात याचठिकाणी विजयी सभा घेऊ, त्या सभेला मी राजला बरोबर घेऊन येईल, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले.





































































































































