मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि त्या पक्षाचे चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय केंद्र सरकारने (Central Government) लिहून दिलेला आहे, निवडणूक आयोगाने तो फक्त जाहीर केला, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची व्यक्त कली आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशात एकही प्रादेशिक पक्ष अस्तित्वात राहणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर संस्था आणि निवडणूक आयोगाने मोदी सरकारच्या आदेशाने प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात केली आहे. अगोदर शिवसेना आणि आज जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत झाले ते लोकशाहीची हत्या करण्याचाच प्रकार आहे. मोदी सरकार आणि निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षच नाही तर या देशातील लोकशाही संपवत आहे.