व्हॉईस ऑफ मीडियाने पत्रकारांच्या संरक्षणासाठी चार हजारांवर पत्रकारांना दिले वीमा सुरक्षा कवच!

the-first-step-of-voice-of-media-for-the-protection-of-news-update-today
the-first-step-of-voice-of-media-for-the-protection-of-news-update-today

बुलडाणा : पत्रकारांच्या हितासाठी अमुक केले पाहीजे, विशिष्ट योजना राबविल्या पाहीजे, पत्रकारांच्या संरक्षणाची जबाबदारी म्हणून संघटनेने आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहीजे, असा सूर गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारांच्या विविध संघटनांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या अधिवेशनात आणि कार्यशाळेत दिसून येतो. परंतु त्याबाबत प्रत्यक्षात ठोस असे कार्य कुणीच केले नाही. ‘व्हॅाईस ऑफ मीडिया’ (Voice Of Media) या संघटनेने मात्र मागचा इतिहास पुसून काढत नवा अध्याय लिहण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील चार हजारांहून अधिक पत्रकारांना वीमा सुरक्षा कवच प्रदान करुन पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले आहे.

पत्रकारिता आणि पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या संघटनेने देशभरात आपले जाळे निर्माण केले आहे. २३ राज्यांत ही संघटना पोहचली असून २२ हजार सभासद यामध्ये सहभागी झाले आहेत. अत्यल्प काळात अतिप्रचंड वेगाने विस्तीर्ण झेप घेणारी ही पत्रकारांची देशातील पहिलीच संघटना ठरली आहे. संघटनाच्या बाबतीतच नव्हे तर कृतीकार्यक्रमातही ही संघटना राज्यात पहिली आणि एकमेव ठरली आहे. राज्यातील पत्रकारांना त्यांच्याकडून एक रुपयाही न घेता त्यांना दहा लाखाच्या अपघाती विम्याचे सुरक्षा कवच देऊन नवा विक्रम या संघटनेने रचला आहे. मुळात पत्रकारांचे कल्याण, पत्रकारांचे संरक्षण, आरोग्य, मुलांचे शिक्षण हे प्रमुख उद्दीष्ठ समोर ठेऊनच या संघटनेचा जन्म झाला. त्यामुळे पत्रकारिता आणि पत्रकारांचे कल्याण हे एकमेव्य धेय्य – धोरण आणि हीच दिशा घेऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या कुशल नेतृत्वात संघटनेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

मुंबई येथे ७ डिसेंबर २०२२ रोजी एक दिवसीय कार्यशाळा आणि चिंतन बैठक पार पडली होती. या बैठकीत संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राज्याध्यक्ष राजा माने, राष्ट्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला यांनी संघटनेबाबत, धोरणांबाबत आणि भविष्यात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांनी पत्रकारांच्या हिताच्या काही योजना मांडल्या होत्या, त्यातीलच एक योजना पत्रकारांना वीमा सुरक्षा कवच देणे ही होती.

२५ डिसेंबर रोजी बुलडाणा येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात राज्यभरातून आलेले पदाधिकारी व बुलडाणा जिल्ह्यातील ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे सर्व सदस्य अशा २५० जणांचा दहा लाखांचा अपघात वीमा उतरविण्यात आला. भारतीय डाक घर अर्थात पोस्ट खात्याच्या वतीने ही वीमा पॉलीसी काढण्यात आल्याने विश्वासार्ह आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही.

बुलडाण्यातून सुरु झालेला हा वीमा पॉलीसीचा उपक्रम ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला. जानेवारी २०२३ अखेरपर्यंत राज्यातील ४२४१ पत्रकार बांधवांना वीमा सुरक्षा कवच प्रदान करण्यात आला होता. एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकारांचा विमा काढणारी ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. पत्रकारांचे संरक्षण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे हे पहिले पाऊल ठरले आहे. यापुढे पत्रकारांचे आरोग्य, पत्रकारांच्या मुला-मुलींचे शिक्षण, पत्रकारांच्या घराचा प्रश्न यासह इतर समस्या सोडविण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने तंत्रशुद्ध नियोजन केले असून लवकर या संदर्भातील कृतीकार्यक्रम देखील समोर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here