नागपूर/मुंबई, दि. ५ फेब्रुवारी: नागपूरच्या संविधान चौकात गोंड गोवारी समाजाचे तीन तरूण ११ दिवसांपासून उपोषण करत आहेत परंतु शासन अथवा प्रशासनातील एकाही व्यक्तीला त्यांची दखल घ्यावी असे वाटत नाही. सरकार उपोषणाची दखल घेत नसल्याने हजारो गोंड गोवारी बांधव नागपुरात दाखल आहेत. या समाजाचा आक्रोश आंधळ्या बहिऱ्या मुक्या भाजपा सरकारच्या (BJP Government) कानावर पडत नाही. आदिवासी बांधव या राज्याचे नागरिक नाहीत का? पक्ष तोडफोडी, गुंडागर्दी व महावसुलीतून थोडा वेळ गोंड-गोवारी समाजासाठीही द्या आणि त्यांच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
नागपुरातील संविधान चौकात सुरु असलेल्या उपोषणाकर्त्यांची नाना पटोले यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली तसेच प्रकृतीची विचारपूसही केली. यावेळी त्यांच्यासोबत नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, गोंड-गोवारी जमातीला अनुसूचित जमातीचे सर्व लाभ देण्यात यावेत तसेच वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे. गोंड-गोवारी जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राच्या आधारे पदवी आणि इतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या बेकायदेशीरपणे रोखून ठेवण्यात आलेल्या शिष्यवृत्ती विनाविलंब देण्यात याव्यात, अशा त्यांच्या मागण्या आहेत परंतु भाजपा सरकारला गोवारी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकार हे आपसातील भाडंणातच व्यस्त आहे. सत्ताधारी पक्षाचा एक आमदार दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतो, सत्ताधारी पक्षातील तोच आमदार मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करतो. तर एक मंत्री मराठा ओबीसी आरक्षणावरून सरकारच्या निर्णयाविरोधात जाहीर भूमिका घेतो. या सरकारमध्ये कसलाही समन्वय नाही. खुर्ची टिकवण्यासाठी चढाओढ सुरु आहे, या साठमारीत जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास शिंदे-फडणवीस व अजित पवार यांच्या सरकारला वेळच नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरचेच आहेत परंतु ११ दिवसामध्ये त्यांना एकदाही गोंड गोवारींच्या उपोषणाची साधी दखलही घ्यावी असे वाटले नाही, हे दुर्दैवाचे आहे. गोंड-गोवारी समाजावरचा अन्याय दूर करण्याच्या त्यांच्या मागणीची सरकारने तात्काळ दखल घेऊन मार्ग काढावा असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.