सुप्रीम कोर्टाकडून अमोल खताळ यांना धक्का; निवडणूक याचिका फेटाळण्याची मागणी नामंजूर, उच्च न्यायालयातील बाळासाहेब थोरात यांच्या याचिकेवरील सुनावणीचा मार्ग मोकळा

The Supreme Court dismissed MLA Amol Khatal's Special Leave Petition; the case challenging his election will continue in the Bombay High Court
The Supreme Court dismissed MLA Amol Khatal's Special Leave Petition; the case challenging his election will continue in the Bombay High Court

नवी दिल्ली : संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडीत सर्वोच्च न्यायालयाने आमदार अमोल खताळ यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) फेटाळून लावली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवरील नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, अमोल खताळ यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रामध्ये शासकीय कराची थकबाकी तसेच ‘नीलकमल’ भागीदारी संस्थेतील भागीदार असल्याची माहिती जाणीवपूर्वक लपवली. त्यामुळे त्यांचे नामनिर्देशन अवैध ठरवून त्यांची निवड रद्द करावी आणि बाळासाहेब थोरात यांना विजयी घोषित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या याचिकेला विरोध करत अमोल खताळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून निवडणूक याचिका चालविण्यास कोणतेही वैध कारण (Cause of Action) नसल्याचा युक्तिवाद केला होता. त्यामुळे याचिका प्रारंभीच फेटाळून लावावी, अशी त्यांची मागणी होती. मात्र, उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावत निवडणूक याचिका सुनावणीस पात्र असल्याचे स्पष्ट केले.

या आदेशाविरोधात अमोल खताळ यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. शासकीय कराची थकबाकी अत्यल्प असल्याने ती निवडणूक याचिकेचा आधार ठरू शकत नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत, शासकीय देयकाची रक्कम कितीही कमी असली, अगदी एक रुपयाची असली तरी ती निवडणूक शपथपत्रात नमूद करणे बंधनकारक आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले.

या निर्णयामुळे आता मुंबई उच्च न्यायालयात मूळ निवडणूक याचिकेवरील सुनावणी पुढे सुरू राहणार असून, अमोल खताळ यांची निवड रद्द करून बाळासाहेब थोरात यांना विजयी घोषित करण्याच्या मागणीवर अंतिम निर्णय उच्च न्यायालय घेणार असल्याची माहिती ॲड. अमित करंडे यांनी दिली.

बाळासाहेब थोरात यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मुकुल रोहतगी यांच्यासह ॲड. शिवाजी जाधव आणि ॲड. अमित करंडे यांनी बाजू मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here