
ठाणे: ठाण्यातल्या एका मंदिरात ही विचित्र घटना घडलीय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये मंदिरात चोरी करण्यासाठी आलेला चोर सुरूवातीला देवाच्या चरणांना स्पर्श करत आशिर्वाद घेत आणि मग नंतर देवासमोरची दानपेटीच चोरून नेतो. आगळ्या वेगळ्या चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना खोपट बस डेपोजवळ असलेल्या कबीरवाडी हनुमान मंदिरात घडलीय. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हनुभक्त चोराला अटक करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, मंदिरात चोरी करण्यापूर्वी हा चोर मोबाईलवर आधी फोटो काढत असल्याचं दिसत आहे. या दरम्यान तो पुन्हा पुन्हा बाहेर बघतोय. यानंतर तो हनुमानच्या मूर्तीच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करतो.
त्यानंतर मूर्तीसमोर ठेवलेली दानपेटीच घेऊन पळून जातो. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली असता त्यांना विशेष काही वाटलं नाही. त्यानंतर मंदिरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही तपासले असता त्यात आरोपी स्पष्ट दिसून आला.
#Maharashtra: Thief touches #God‘s feet before STEALING donation box from #temple in #Thane | #Viral #Video pic.twitter.com/1rdHTe9rl0
— Journalist Anurag K Sason (@AnuragSason) November 13, 2021
नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आजूबाजूच्या लोकांची तातडीने चौकशी करण्यात आली. मंदिरात कोणी राहत नाही हे फक्त इथल्या स्थानिक रहिवासीयांनाच माहीती आहे. हे गृहीत धरूनच पोलिसांनी तपास सुरू ठेवला.
पोलिसांच्या पथकाने चोराचा फोटो स्थानिक लोकांना दाखवला, यावरून संशयितांच्या ओळखीचे अनेक संकेत मिळाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी राबोडी इथे राहणाऱ्या केजस म्हसदे (वय 18) याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने त्याच्या मित्राचाही उल्लेख केला, त्यालाही अटक करण्यात आली आहे.
खोपट बस डेपोजवळील कबीरवाडी हनुमान मंदिराचे पुजारी महंत महावीरदास यांनी सांगितले की, ते मंदिरात पोहोचले असता दानपेटी गायब होती. यानंतर पोलिसांना संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली. दानपेटीत हजार रुपये असल्याचे पुजाऱ्याने सांगितले.