“पाकिस्तानात जाऊन जिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणारी तुमची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं?

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्र सोडलं

uddhav-thackeray-dussehra-melava-speech-slams-bjp-on-hindutva-news-update-today
uddhav-thackeray-dussehra-melava-speech-slams-bjp-on-hindutva-news-update-today

Uddhav Thackeray Speech Dasara Melava 2022 : “पाकिस्तानात जाऊन जिनांच्या थडग्यावर डोकं टेकवणारी तुमची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं? नवाज शरीफच्या वाढदिवसाला न बोलवता जाऊन केक खाणारा तुमचा नेता आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? काश्मीरमध्ये सत्तेच्या लोभापायी दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या मुफ्तीच्या पक्षाशी तुम्ही साटंलोटं करता आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता?” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपावर टीकास्र सोडलं.

शिवसेनेनं महाविकास आघाडीसमवेत सरकार स्थापन केल्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपाकडून टीका केली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून शिवसेनेनं हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा दावा सातत्याने भाजपाकडून केला गेला आहे. त्यात शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर भाजपाचीच री ओढत हिंदुत्वावरून शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवाजी पार्कवर पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये भाषणात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर तोंडसुख घेतलं. तसेच, त्यांनी हिंदुत्ववाद्यांना एका व्यासपीठावर येण्याचं आव्हानही दिलं.

“सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपीठावर यावं”

“चला एकदा सगळ्या हिंदुत्ववाद्यांनी एका व्यासपीठावर यावं. त्यांनी त्यांचं हिंदुत्व सांगावं, मी माझं वडिलोपार्जित हिंदुत्व सांगतो. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं की आमचं हिंदुत्व शेंडीधारी नसून राष्ट्रीयत्वाशी जोडलं गेलेलं आहे. मग व्याख्या स्पष्ट आहे. विचार सोडले, विचार सोडले म्हणत आहेत. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितलं आहे की जो या देशावर प्रेम करतो तो मुसलमान असला तरी आमचा आहे. प्रत्येकानं आपापला धर्म आपल्या घरात ठेवावा. घराबाहेर पाय ठेवला तर हा देश हाच आमचा धर्म”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 “..तेव्हा तुमच्या हातात स्टेनगनच हवी”

“पण जर कुणी त्याच्या धर्माची मस्ती आमच्यासमोर रस्त्यावर करायला लागला, तर आम्ही कडवट देशाभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहू. नुसती जपमाळ ओढून हिंदू होत नाही. तुमच्या हातात जपमाळ असताना समोर दहशतवादी उभा राहिला, तर राम राम म्हणून तो पळणार नाही. तुमच्याही हातात स्टेनगनच असायला हवी”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 शिंदे गटाला खोचक टोला

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या दसरा मेळाव्यावर खोचक शब्दांत टोला लगावला. “माझा तर विचार होता की या सभेला येण्याऐवजी तिथे जाऊन नवीन हिंदुत्वाचे विचार ऐकावेत. कारण ईडीच्या कार्यालयात गेलं की लगेच यांच्या हिंदुत्वाच्या घागरी फुंकायला लागतात”, असं ते म्हणाले.

औरंगजेब नावाच्या सैनिकाचं दिलं उदाहरण

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भारतीय लष्करातील औरंगजेब नावाच्या एका सैनिकाचं उदाहरण दिलं. “औरंगजेब नावाचा गनमॅन सुट्टीसाठी घरी जात असताना त्याचं अपहरण झालं. काही दिवसांनी त्याचं प्रेत सापडलं. तो धर्मानं मुसलमान असूनही त्याचं अपहरण करणाऱ्या मुसलमान दहशतवाद्यांनी त्याला सोडलं नाही. कारण तो भारताच्या बाजूने लढत होता. तो औरंगजेब मुसलमान असला तरी आमचा भाऊ आहे हे हिंदुत्व उघड आहे, जाऊन सांगा कुणाला सांगायचंय”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here