Sanjay Raut on Maharashtra Political Dispute : आमदार अपात्र ठरतील, सरकार येईल, सरकार जाईल राजकारणात या गोष्टी घडत असतात. पण या देशाच्या भविष्याचा फैसला उद्या होईल, असं संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी संपली आहे.
न्यायालयाने सत्तासंघर्षाबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालय उद्या (गुरुवार) यावर निकाल देणार आहे, याबाबतची घोषणा स्वत: सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केली आहे. सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे.
सत्तासंघर्षावरील निकाल उद्या लागणार असल्याची घोषणा सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा उद्याचा निकाल भारताची लोकशाही समृद्ध करणारा असेल, हा निकाल आमच्याच बाजुने लागेल, अशी आम्हाला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी फोनवरून संवाद साधत होते.