हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं

uddhav-thackeray-interview-governor-bhagat-singh-koshyari-hindutva
uddhav-thackeray-interview-governor-bhagat-singh-koshyari-hindutva

मुंबई l भाजपाकडून मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात आंदोलनं झाली. ही आंदोलन सुरू असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav thakceray यांना पत्र लिहून हिंदुत्वाच्या मुद्यावरून डिवचल होतं. राज्यपालांनी उपस्थित केलेल्या हिंदुत्वाच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतून उत्तर दिलं. “हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान राऊत यांनी राज्यपाल व भाजपाकडून उपस्थित करण्यात आलेल्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला. “अनेकदा सध्या असं वर्षभरात दिसतं.

खरं तर देशात हे चित्र दुर्मिळ आहे की, एक बहुमताचं सरकार काम करत असताना राजभवनामध्ये समांतर सरकार चालू आहे. एक समान धागा याच्यात असा आहे की, राज्यपाल आणि भारतीय जनता पक्ष दोघांचाही एकच आरोप आपल्यावरती आहे, तो म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलंय का?,” असं संजय राऊत म्हणाले.

वाचा l उपमुख्यमंत्री अजित पवारांसह ६९ जणांना मोठा दिलासा

या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले,”जाऊ द्या हो, करू दे हो… करू दे त्यांना मजा. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना टोला लगावला.

“मंदिरे उघडण्याच्या निमित्ताने हा विषय सुरुवातीला आला. आपण आता मंदिरे उघडलेली आहात, पण मंदिरं उघडणं आणि हिंदुत्व यांचा काही संबंध आहे का?,” असा प्रतिप्रश्न राऊत यांनी केला. “मी शिवसेनाप्रमुखांचं आणि माझ्या आजोबांचं हिंदुत्व मानतो. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोयय मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे आणि ते त्यांनी 92-93 साली करून दाखवलं.

बाबरी पाडली गेली, मी म्हणेन त्याचेसुद्धा श्रेय घेण्याची कुणाची हिंमत नव्हती, ती शिवसेनाप्रमुखांनी दाखवली. सर्व ताकदीने सरकार आल्यानंतरही राममंदिर उभारण्याची तुमची हिंमत नव्हती. ते कोर्टाच्या निकालामुळे तिकडे होतंय… राममंदिराचं श्रेय कुठल्याही राजकीय पक्षाने घेऊ नये. कारण तो न्यायालयाने दिलेला निकाल आहे, सरकारने ठरवलेलं नाही. मग हिंदुत्व म्हणजे काय?

हिंदुत्व म्हणजे फक्त पूजाअर्चा करणं आणि घंटा बडवणं आहे काय? त्याने करोना नाही जात हे सिद्ध झालेलं आहे. उगाच कोणत्याही धर्माच्या आडून तुम्ही राजकारण करू नका… आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. पहिलं या देशातलं भगव्याचं स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलं. त्याच्यामुळे निदान महाराष्ट्राच्या मातीला तरी हिंदुत्व… आणि तेही तुमचं दलालांचं हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नका,” असं टीकास्त्र ठाकरे यांनी विरोधकांवर डागलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here