नकोशीचे असलेपण..!

For Jijaun's daughter
For Jijaun's daughter

राज्यातील सर्व जिल्ह्यांत माझी सध्या टूर सुरू आहे. पत्रकारांच्या सुख-दु:खाच्या अनेक घटना कानावर आल्या की, तिथे जावे वाटतेच. पत्रकारांची अवस्था फार वाईट आहे. मी सोलापूरमध्ये होतो, तिथल्या शासकीय दवाखान्यात एक सेवानिवृत्त पत्रकार उपचार घेत आहेत असे मला समजले. त्यांच्याशी बोलून मी त्यांना भेटायला येणार आहे, असे त्यांना सांगितले. मी दवाखान्यात गेलो. सरकारी दवाखाना म्हणजे काय बोलायचे? आपल्या राज्यात सरकारी मालमत्तेची कुणाला काळजी आहे का? असे प्रश्न तिथली एकूण व्यवस्था पाहून मलाच पडले होते. मी दिलेल्या ठिकाणी पोहचलो. मला ज्या रमेश जोशी नावाच्या पत्रकाराला भेटायचे होते, ते एक्स-रे काढण्यासाठी आतमध्ये गेले होते. मी त्यांच्या कॉटच्या शेजारी बसलो.

बाजूला एक महिला आणि कॉटवर पडलेला एक माणूस अतिशय भावनिक होऊन एकमेकांशी बोलत होते. मी कान टवकारून त्यांचे बोलणे ऐकत होतो. त्यांच्या बाजूला असलेली दोन माणसे त्या महिला आणि माणसाची समजूत काढत होते. जे झाले ते जाऊ द्या, असे ते म्हणत होते. तो पेशंट असलेला माणूस त्या महिलेला म्हणत होता, “बेटा मला माफ कर, आयुष्यभर तुझे कधीही तोंड पाहायचे नाही,” असा निर्णय घेतला होता. माझा अहंकार आयुष्यभर आडवा आला. तुझ्यासह सर्व बहिणींवर मी खूप मोठा अन्याय केला. तुमचे कुणाचेही तोंड पाहायचे नाही, असे मी ठरवले होते. तुमचा काही दोष नसताना तुम्हाला खूप मोठी शिक्षा दिली. आता मरणाचे शेवटचे दिवस जवळ आले असे वाटते. मध्येच ती व्यक्ती रडत होती, जोरजोराने खोकत होती. ती महिला त्यांचे डोळे पुसत होती. त्यांचा संवाद मी खूप वेळ ऐकला. मला तो सगळा संवाद कळला, पण ते नेमके कशामुळे झाले हे मला काही कळेना. मी ज्या पत्रकार बांधवाला भेटायला आलो होतो, ते रमेश जोशी आले. ते आल्या आल्या माझ्या गळ्यात पडले, भावनिक होऊन रडले. रमेशजी आणि मी औरंगाबादमध्ये एका ठिकाणी अनेक वर्ष काम केले होते. रमेश तत्त्व, मूल्य जपणारे पत्रकार होते. आयुष्यभर अनेकांना न्याय देता देता रमेश स्वत:वर मात्र अन्याय करीत गेले. हे रमेश यांच्या सेवानिवृत्तीनंतर लक्षात आले. रमेश यांना मूल-बाळ नाही. रमेश आजारामध्ये सोलापूरला त्यांच्या बहिणीच्या घरी आले. आता दवाखान्यात आहेत. रमेश आणि माझ्या खूप गप्पा झाल्या. आमचे जोराचे बोलणे सुरू होते. बाजूला असलेला तो माणूस जो त्या महिलेशी बोलत होता, तो म्हणाला, “मी तर पेपर वाचणे सोडून दिले आहे, इतक्या नकारात्मक बातम्या त्यामध्ये असतात की, विचारू नका. सतत त्याच त्या बातम्या टीव्हीवर पाहून वाटते, टीव्ही फोडून टाकावा.” माझी नजर एकदम त्या व्यक्तीकडे गेली. मला त्यांना बोलायचेच होते. आमचे बोलणे थोडेसे रंगात आल्यावर मी त्या व्यक्तीला म्हणालो, “तुमच्या समोर बसलेल्या या महिला कोण आहेत, त्या खूप वेळ झाल्यापासून तुमच्याकडे बघून रडत आहेत का? काय झाले त्यांना?” ते माझ्याशी काहीही बोलले नाहीत, ते एकदम शांत झाले. मला लक्षात आले, त्यांना मी जे काही विचारले, ते त्यांना आवडले नाही. मी त्या व्यक्तीला म्हणालो, “माफ करा, मी तुम्हाला हा प्रश्न सहज विचारला. तुम्ही बोलत असताना, माझ्या कानावर काही विषय पडले, नेमके काय घडले हे मला कळेना. म्हणून मी बोललो.” रमेश आणि मी पुन्हा एकमेकांशी बोलत होतो. ती व्यक्ती उठली आणि आमच्या जवळ येऊन बसली. आम्ही बोलायला सुरुवात करणार तेव्हढ्यात डॉक्टर तपासायला आले. डॉक्टर रमेशला म्हणाले, “तुम्ही अजून काळजी घ्या, ते आवश्यक आहे.” त्यांनी आमच्याशी बोलणाऱ्या त्या व्यक्तीला तपासले, तपासून झाल्यावर डॉक्टर म्हणाले, “काका, तुम्ही तर एकदम ठणठणीत झालात. औषध वेळेवर घेता असे दिसते.” तो माणूस लगेच म्हणाला, “नाही माझी मुलगी आली ना, म्हणून मी बरा झालोय.” तो तपासणारा डॉक्टर मुलगा एकदम तरुण होता. तो म्हणाला, “अहो, काल साहेबांनी औषध बदलून दिले, म्हणून हे सारे घडले आहे.” ती व्यक्ती पुन्हा अगदी नम्रपणे म्हणाली, “अहो, मी खरे सांगतो, हे माझ्या मुलीमुळे झाले, काल पहिल्यांदा माझ्या मुलीला पाहिले.” ती व्यक्ती काय बोलते, ते कुणाला काहीही कळेना, डॉक्टर आल्यापावली तसेच निघाले. माझे मन मात्र एकदम बेचैन झाले होते. त्या महिलेला घेऊन तो माणूस असे का उत्तर देतो. काहीतरी आहे जे त्या माणसाला सांगायचे आहे, पण तो सांगत नाही. हे माझ्या ध्यानात आले. थोड्या वेळाने सर्व शांत झाले. मी रमेश आणि तो माणूस इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसलो होतो. ती बाई आणि अन् त्या बाईसोबत असणारा माणूस शांत होता. मी त्या माणसाकडे तो विषय पुन्हा काढला, त्या माणसाने शांतपणे त्या महिलेकडे पाहिले अन तो बोलायला लागला. तो जेवढा वेळ बोलला तेव्हढा वेळ आम्ही सारे शांत होतो. अहंकार आणि घाणेरड्या मानसिकतेमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते, पण ते त्याला कळत नाही. याचे उत्तम उदाहरण त्या माणसाचे आयुष्य होते.

मी ज्यांच्याशी बोलत होतो, त्यांचे नाव रणजितसिंह ठाकूर. त्यांच्या मामाची मुलगी ज्योत्स्ना यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ठाकूर यांना सहा बहिणी. त्यांचे वडील भानुसिंह यांना मुली नाही तर मुले हवे होते. सतत होणाऱ्या मुलींमुळे रणजितसिंह यांचे वडील समाधानी नसायचे. रणजितसिंह यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीकडून त्यांना मुलगा हवा होता. ‘मुलगी नको’ या मानसिकतेचे ठाकूर कुटुंबीय होते. त्याला त्या कुटुंबाचा इतिहास कारणीभूत होता. ठाकूर कुटुंबातील तीन मुलींनी इतर समाजाच्या मुलांसोबत पळून जाऊन विवाह केला होता. त्यातून मुलगी नको, अशी मानसिकता सर्वांची झाली होती. रणजितसिंहला पहिली मुलगी झाली अन् अवघ्या ठाकूर कुटुंबाची घोर निराशा झाली. दुसऱ्यांदाही मुलगी झाली. रणजितसिंहला त्यांच्या बापाचे दु:ख पाहवत नव्हते. त्याने एका गुरूचा सल्ला घेऊन त्याच्या असलेल्या कोणत्याही मुलीचे तोंड पाहायचे नाही, अशी शपथ घेतली. आणि ते दर वेळेला मुलगा होईल याची वाट पाहत होते. सात बाळंतपण झाले तरीही मुलीच होत राहिल्या. शिक्षणासाठी कधी मुली नातेवाईकांकडे पाठवल्या, तर कधी वस्तिगृहात. लग्नातही रणजितसिंह यांनी मुलींचे तोंड पाहिले नाही. आठव्या बाळंतपणात त्यांची पत्नी आठव्या मुलीला जन्म देऊन वारली. रणजितसिंह हे त्यांची सारी कहाणी मला सांगत होते.

रणजितसिंह यांचे वय आता सत्तरीकडे झुकले आहे. आता रणजितसिंह यांना कळू लागले की, आपले काय चुकले. आयुष्यभर आठ मुलींमधून कुणाचाही चेहरा बघायचा नाही, अशी शपथ घेणारे रणजितसिंह यांना आता वाटते की, आपण मुलींना भेटायला पाहिजे. त्यांची तोंडे पाहिली पाहिजेत. म्हणून त्यांनी त्यांच्या सर्व मुलींची चौकशी सुरू केली. या सर्व मुलींच्या शिक्षण, लग्नासाठी रणजितसिंह यांनी मदत केली नाही असे अजिबात नाही, पण त्यांनी तोंड न पाहण्याचा त्यांचा ‘पण’ कायम ठेवला. अहंकार टोकाला गेलेल्या माणसांचा जीव गेला तरी, माणसे आपला स्वभाव सोडत नाहीत. तसेच काहीसे रणजितसिंह यांच्या बाबतीत झाले होते. पण आता शेवटच्या क्षणी तरी मुलींचे तोंड पाहण्याची
इच्छा रणजितसिंह यांची झाली हे काय कमी नव्हते. पाच नंबरची मुलगी आजाराने जात राहिली. तिलाही तीन मुलीच आहेत. बाकी सर्व मुलींना अधिकच्या मुलीच आहेत. मला भेटायला या, असा निरोप रणजितसिंह यांनी त्यांच्या सर्व मुलींना पाठवला. त्यामध्ये तीन मुली आल्या, त्या बापाला भेटल्या. बाकीच्या पाच जणींमध्ये रणजितसिंह यांचे जीन्स पक्के भरले होते. त्या आल्याच नाहीत. बाप जिवंत असून आम्ही, मेलोत की जिवंत आहोत, हे त्यांनी कधीच पाहिले नाही. अशा निर्दयी बापाचे तोंड का पाहायचे? असे म्हणून बाकीच्या मुली बापाला भेटायला आल्याच नाहीत. आयुष्य कसे गेले, किती खाचखळगे आले हे रणजितसिंह ठाकूर सांगत होते. मला एकीकडे प्रचंड वाईट वाटत होते आणि दुसरीकडे रणजितसिंह यांना घेऊन माझ्या मनात प्रचंड चीड येत होती. कसा हा बाप? हा असा का वागला असेल?

रणजितसिंह यांची मुलगी आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाली. सुरुवातीला ती हो ला हो करीत होती, पण पुन्हा तीही बोलायला लागली. आमचे तोंड पाहायचे नाही असे बापाने ठरवले असले तरी आम्ही त्यांना अनेक वेळा भेटण्याचा, बोलण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी एखादा आजार लागावा असा नकार दिला. मुलगी आणि बापाचे नाते खूप घनिष्ट असते, असे म्हणतात, आमचे हे नाते कसे? चाळीस वर्षे मी माझ्या बापाचे तोंड न पाहता राहिले, काय वाटले असेल मला, आम्हा सर्व बहिणींच्या मनाला? असे सांगत ती मुलगी रडत होती. आमच्या गप्पा एवढ्या रंगल्या की, आम्ही कुणी बाहेरचे आहोत, असे कधीही कुणाला वाटले नाही. रणजितसिंह एकदम शांत होते, मध्येमध्ये मुलीसमोर हात जोडत होते. आम्ही सर्व जण मोकळेपणाने बोलत होतो. रणजितसिंह म्हणाले, “मी आजाराने खंगलोय, एका पिकल्या पानासारखी माझी अवस्था झाली आहे. मरायच्या अगोदर माझी जी काही शिल्लक संपती आहे ती माझ्या मुलींच्या नावे मला करून द्यायची आहे.” रणजितसिंह यांचे वाक्य संपते न संपते, ती मुलगी लगेच म्हणाली, “आम्हाला तुमची एक फुटकी कवडीपण नको, हे मी माझ्या सर्व बहिणींच्या माझ्या वतीने बोलतोय.” रणजितसिंह म्हणाले, “मी माझी चूक मान्य करूनही तुम्ही मला माफ करीत नाहीत? असे नका करू ना.” कोणीही काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मीच म्हणालो, “आता निघायला पाहिजे, मी निघतो.” सर्वजण एकदम भानावर आले. मी रणजितसिंह यांच्या जवळ गेलो आणि मोठ्या हिमतीने त्यांना म्हणालो, “तुमची चूक क्षमा करण्यायोग्य नाही, पण तुम्ही या काळात का होईना, मुलींना बोलावण्याचा, पाहण्याचा निर्णय घेतला तोही स्वागतार्ह आहे. आता एकच करा, दवाखान्यातून गेल्यावर प्रत्येक मुलीच्या घरी जा, यांच्या पायावर “तू माझी आई म्हणून” डोके ठेवा. कदाचित त्या तुम्हाला माफ करतील. रणजितसिंह यांनी होकाराची मान हलवली. रणजितसिंह यांना जी नकोशी होती, तीच आज रणजितसिंह यांच्या म्हातारपणात आपलेपणाची काठी बनली होती. मी रणजितसिंह यांची मुलगी रंजना हिच्यापुढेही नतमस्तक झालो. रमेश यांच्या हातावर चार पैसे ठेवून मी दवाखान्याच्या बाहेर निघालो.

जसा त्या सरकारी दवाखाण्यात माझा श्वास कोंडत होता. रंजनाचे सर्व ऐकून मला प्रचंड त्रास झाला होता, तसा त्रास त्या दवाखान्यात आणि दवाखान्याबाहेर आल्यावर शहराची बकाल अवस्था पाहून झाला होता. सोलापूर कामगारांचे शहर, सोलापूर चादरींचे शहर असे कधीकाळी होते. जसा नकारात्मक सूर, पोटच्या मुलींना घेऊन ‘त्या’ बापाने काढला होता तसा सूर सरकारी यंत्रणा, राजकीय इच्छाशक्तीने सोलापूरच्या विकासाला घेऊन काढला होता. काय ती शहराची वाईट अवस्था, बापरे! नकारात्मक सूर, तीच ती बदल न स्वीकारण्याची मानसिकता आणि अहंकारासारखा गंभीर आजार, यातून होणारे दुष्परिणाम मानवतेला होवो की इतिहासाला, हानिकारक असतातच. रणजितसिंह यांच्यासारख्या वृत्तीमुळे समाजाचे सर्वांगाने नुकसान होतेच होते, हे खरे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here