लखीमपूर हिंसाचाराचा व्हिडीओ ट्वीट करणाऱ्या वरुण गांधींसह मनेका गांधींना भाजपचा दणका!

varun-gandhi-out-of-top-bjp-body-after-his-tweets-on-lakhimpur-kheri-violence-news-update
varun-gandhi-out-of-top-bjp-body-after-his-tweets-on-lakhimpur-kheri-violence-news-update

नवी दिल्ली: भाजपानं आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी (BJP National Executive Committee) आज जाहीर केली आहे. या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना स्थान देण्यात आलं आहे. गेल्यावेळी लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान सध्या लखीमपूर हिंसाचारावरुन विरोधक धारेवर धरत असताना पक्षाला घऱचा आहेर देणाऱ्या वरुण गांधींना (varun Gandhi) मात्र भाजपाने मोठा धक्का दिला आहे.

भाजपानं राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी ८० सदस्यांची यादी जाहीर केली असून यामध्ये वरुण गांधींना स्थान देण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे मनेका गांधी यांनाही पक्षाने वगळलं आहे. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही यादी जाहीर केली आहे. वरुण गांधी लोकसभेत पिलभित मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, तर मनेका गांधी सुलतानपूर येथून खासदार आहेत.

कृषी कायदे असोत किंवा लखीमपूर खेरी हिंसाचार…वरुण गांधी नेहमीच आपलं परखड मत मांडत आले आहेत. गुरुवारी त्यांनी लखीमपूर खेरी येथील घटनेचा व्हिडीओ ट्वीट करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.

लखीमपूर खेरी हिंसाचाराचा एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भरधाव वेगाने धावणारी एसयुव्ही शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा खासदार वरुण गांधी यांनीदेखील व्हायरल झालेला हा व्हिडीओ शेअर करत पक्षाला घऱचा आहेर दिला. वरुण गांधी यांनी यावेळी ही हत्या असल्याचं म्हटलं आहे.

ट्विटरला व्हिडीओ शेअर करताना वरुण गांधी म्हणाले की, “या व्हिडीओत सर्व काही स्पष्ट आहे. हत्या करुन आंदोलकांना शांत केलं जाऊ शकत नाही. निष्पाप शेतकर्‍यांच्या रक्तासाठी जबाबदार घेणं आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात क्रूरता आणि अहंकाराचा संदेश पोहोचण्यापूर्वी न्याय झाला पाहिजे”.

महाराष्ट्रातून या नेत्यांना संधी

यादीमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या जबाबदारीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान विजया रहाटकर यांचा गेल्या वेळी समावेश करण्यात आला होता, मात्र, आता त्यांचं नाव यादीतून काढण्यात आलं आहे. त्यासोबत विशेष निमंत्रित म्हणून सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार यांचा देखील राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील इतर भाजपा नेते

चित्रा वाघ, आशिष शेलार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याव्यतिरिक्त प्रकाश जावडेकर, विनय सहस्त्रबुद्धे यांचा देखील कार्यकारिणीत सदस्य म्हणून समावेश आहे. त्यासोबत पदाधिकारी म्हणून विनोद तावडे (राष्ट्रीय मंत्री), सुनील देवधर (राष्ट्रीय मंत्री), पंकजा मुंडे (राष्ट्रीय मंत्री), हीना गावित (राष्ट्रीय प्रवक्त्या), जमाल सिद्दिकी (अल्पसंख्य मोर्चा), देवेंद्र फडणवीस (माजी मुख्यमंत्री) यांचा समावेश यादीमध्ये करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here