
औरंगाबाद : शिंदे सरकार ५६ मुस्लिमबहुल शहरातील मुस्लिम समाजाच्या आर्थिक, सामाजिक स्थितीचा आढावा घेणार आहे. त्याबाबत मुंबईतील टाटा समाज विज्ञान या शैक्षणिक संस्था हे काम बघणार आहेत. मात्र, शिंदे सरकारकडून हे फक्त नौटंकी आहे. मुस्लिम समाज आपल्यासोबत जोडला गेला पाहिजे हे दाखवण्यासाठी सर्व खटाटोप सुरु आहे. त्यांना मुस्लिम आरक्षणाशी काही देणे घेणे नाही. असा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा तथा प्रवक्त्या विद्या चव्हाण (vidya chavan) यांनी गुरुवारी केला.
विद्या चव्हाण ह्या गुरुवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीसाठी शहरात आल्या होत्या. त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शिंदे सरकार, मोदी सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. प्रा. खासदार फौजिया खान, राष्ट्रीय सचिव तथा समन्वयक आशा मिरगे, आशा भिसे, जिल्हाध्यक्षा छाया जंगले, शहराध्यक्षा मेहराज पटेल यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, मुस्लिम, मराठा समाजाला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तत्कालीन आघाडी सरकारने शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिले होते. मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता निवडणुका जवळ आल्यामुळे शिंदेना मुस्लिम समाजाची आठवण आली आहे.
आज महागाई, बेरोजगारीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. केंद्र व राज्याचे याकडे लक्ष नाही. मोदी सरकारने दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. आठ वर्ष उलटले १६ कोटी तरुणांना रोजगार देणे गरजेचे होते परंतु ते दिले नाही. महागाई शंभर दिवसात कमी करणार होते. महागाई २०० पट वाढली. धार्मिक तेढ वाढवण्याचे काम भाजप करत आहे.
महिला असुरक्षित आहेत. अत्याचाराच्या घटना वाढल्या. नवीन उद्योग नाही, जे उद्योग महाराष्ट्रात तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आणले होते ते उद्योग इतर राज्यात पळविण्यात आले. असाही आरोप विद्या चव्हाण यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या, देशाच्या विविध समस्यांवरून तसेच जनेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारत राहणार, असा इशाराही विद्या चव्हाण यांनी यावेळी दिला.
हेही वाचा: भाजपमध्ये उध्दव ठाकरेंचे आव्हान स्वीकारण्याची हिंमत नाही; विद्या चव्हाणांचा हल्लाबोल