मुंबई : नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदासुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त पदावर आयपीएस अधिकारी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे.
नांगरे पाटील यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार रवींद्रकुमार सिंघल यांच्याकडून 2मार्च 2019 रोजी स्विकारला होता. काही दिवसांपासून नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा सुरु होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 45 अधिका-यांच्या बदलींच्या प्रस्तावावर साक्ष-या केल्या. नाशिकच्या जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांची पदोन्नतीने अमरावतीच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. डॉ. आरती सिंह यांनी मागच्या वर्षी 2 मार्च रोजी संजय दराडे यांच्याकडून स्विकारला होता.
नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिग दोरजे यांचा कालावधी पुर्ण झाल्यमुळे त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्तपदी नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्याचे प्रताप दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 30 मे 2018 रोजी दोरजे यांनी पदभार स्वीकारला होता.